
हाजी गुलाबभाई वजिरभाई सैय्यद
सिन्नर काजीपुरा-संभाजी चौक येथील रहिवाशी आणि सिन्नर नगरपालिकेचे सेवानिवृत्त लिपिक हाजी गुलाबभाई वजिरभाई सैय्यद यांचा 40 व्याचा विधी नुकताच संपन्न झाला.
हाजी गुलाबभाई सैय्यद यांचे मूळ गाव करंजी खुर्द, तालुका-निफाड,जिल्हा-नाशिक हे होय. त्यांचे वडील वजिर सैय्यद हे मुलांच्या शिक्षणासाठी सिन्नर येथे स्थायिक झाले.त्याकाळी लोंढे गल्ली येथील भद्रकाली मंदिरा शेजारील थिएटर जवळ भरणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गुलाबभाईंचे प्राथमिक शिक्षण पूर्ण झाले आणि शेठ ब.ना.सारडा विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले.जुनी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण झाल्याने सिन्नर नगरपालिकेमध्ये लिपिक म्हणून सेवेची सुरुवात झाली,परंतु त्याकाळी सिन्नरच्या सर्व बाजूंना जकात नाके असल्याने ते गुलाबभाई नाकेकारकून म्हणून परिचित झाले. सिन्नर ग्रामीण रुग्णालयात कंपाउंडर असलेले आदमभाई शेख यांची मुलगी रजिया यांच्याशी त्यांचा विवाह झाला.त्यांना दोन मुली आणि तीन मुले आहेत त्यापैकी थोरला मुलगा अब्बास सैय्यद हा 35 वर्षांपासून सिन्नर मुसळगाव एमआयडीसीतील त्रंबक रबर या कंपनीत तंत्रज्ञ म्हणून काम करीत आहे. मधला मुलगा जावेद सैय्यद हा अनुकंपातत्वानुसार त्यांच्या जागी सिन्नर नगर परिषदेमध्ये 25 वर्षांपासून लिपिक या पदावर कार्यरत आहे तर धाकटा मुलगा जमिर सैय्यद हा माध्यमिक आश्रमशाळा रामनगर येथे 20 वर्षांपासून माध्यमिक शिक्षक पदावर कार्यरत आहे. तीनही मुले वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून समाजकार्यात अग्रेसर आहेत.जमिर सैय्यद यांचे विविध शैक्षणिक संघटनांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात भरीव योगदान आहे.हाजी गुलाबभाई सैय्यद यांनी आपल्या 86 वर्षाच्या जीवनकाळात सर्वधर्म समभाव जोपासण्याचे काम केले,सर्वांच्या सुखदुःखात सहभागी झाले.वाचनाची प्रचंड आवड असल्याने सर्वांना वाचनास प्रवृत्त केले.प्रबोधनासाठी त्यांनी गायन केलेली जखडी भजने आजही लोकांच्या हृदयात आहेत. त्यांचा पुतण्या ह.भ.प.जलाल महाराज सैय्यद हा महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार आहे. 2011 साली पवित्र हज यात्रा झाल्यानंतर मुळगाव करंजी येथे मशिदीच्या निर्माणासाठी परिश्रम घेतले. काजीपुरा येथे साजरी होणाऱ्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जमा होणारा निधीचा सांभाळ केला.हिंदू-मुस्लिम समाजातील शेकडो मुला-मुलींची लग्न जमविली.आपल्या मितभाषी स्वभावाने सर्वांना आपलेसे केले.नातेवाईक आणि मित्रांचा मोठा परिवार यशस्वीपणे सांभाळला.सिन्नर नव्हे तर संपूर्ण नाशिक जिल्ह्यात त्यांनी मैत्रीचे जाळे गुंफले होते त्यामुळे आदराने त्यांच्याकडे पाहिले जात असे.सेवानिवृत्तीनंतर 25 वर्षांपर्यंत बहुजनांच्या विकासासाठी अथक,निस्वार्थ आणि प्रामाणिक सेवा दिली. वयाच्या 86 व्या वर्षी देखील त्यांचा उत्साह वाखाणण्या जोगा होता.त्यांच्यातील ऊर्जा तरुणांना लाजवणारी होती.निरोगी आयुष्य जगत असताना अचानकपणे तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या अकस्मात जाण्याने कुटुंबीयांबरोबरच हिंदू-मुस्लिम बांधवांवर दुःखाचा डोंगर कोसळला.आयुष्याच्या शेवटपर्यंत सर्वधर्म समभाव जपणाऱ्या हाजी गुलाबभाई सैय्यद यांना भावपूर्ण आदरांजली.
शब्दांकन-महामित्र दत्ता वायचळे,सिन्नर.
