
दिनांक : 26 आक्टोंबर 2025
लिहीणार : गोविंद मोरे सर अर्थात
जी.बी.मोरे सर सिन्नर (चौगांवकर)
स्निग्धता म्हणजे चिकटपणा. स्निग्ध पदार्थ आपल्या बरोबर दुसऱ्या पदार्थाला घट्टपणे धरून ठेवतो. आपल्या वागण्या बोलण्यात मधाळ स्निग्धता असेल तर आपण आपले आप्त स्वकीय, मित्र यांना प्रेमाने , आपुलकीने , जिव्हाळ्याने जवळ करू शकतो. स्निग्धतेवरूनच स्नेह शब्द तयार झाला. स्नेह म्हणजे एकमेकांविषयीचे प्रेम आणि जिव्हाळा. स्नेह या शब्दातही स्निग्धता आहेच. स्नेहाची बरसात करणारा असाच एक स्नेह मेळावा दिनांक 26 आक्टोंबर 2025 रोजी गूरेवाडी फाट्यावर हाॅटेल श्रीनाम येथे पार पडला. नुतन जवाहर विद्यालय ,मनेगाव या शाळेतील 1993-94 ला दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. हाॅटेल श्रीनाम हे याच शाळेतील माजी विद्यार्थ्याचे भारत सोनवणे यांचे आहे.
जवळजवळ चाळीस वर्षे मी अध्यापनाचे काम केले. पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवले. सेवानिवृत्त झाल्यावर कोचींग क्लासही चालवला. पोलीस भरती आणि मिलीटरी भरतीची तयारी करणाऱ्या मुलांनाही शिकवले. आजपर्यंत किती तरी मुले माझ्या नजरेखालून गेली असतील. लहानपणी असलेली निष्पाप , निरागस आणि फाटक्या तुटक्या कपड्यात पाहीलेली लहान मुले मुली जेंव्हा मोठी होवून सजून धजून सामोरी येतात तेंव्हा बरीचशी मुले ओळखू येत नाहीत. आपल्यापेक्षा मोठी , धडधाकट दिसणारी मुले जेव्हा शिक्षकांच्या चरणस्पर्शासाठी नतमस्तक होतात तेंव्हा शिक्षकांना खुप भरून येते. आपण ज्यांना शिकवले , ज्यांना प्रसंगी छडीचा प्रसाद दिला , ज्यांच्यावर प्रसंगी रागावलो आणि ज्यांच्यावर आपण आपल्या अपत्यागत प्रेम केले अशी मुले नुसत्या शरीरानेच नाही तर यश किर्तीनेही मोठी झालेली पाहण्यात शिक्षकाला मनातून खूप आनंद होत असतो. स्नेह मेळावा हा आपल्या वर्गमित्रांना भेटण्याचा आणि आपल्या शिक्षकांविषयीचे ऋण व्यक्त करण्याचा सोहळा असतो. असाच एक धमाल सोहळा काल पार पडला. या संस्मरणीय कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी मला प्राप्त झाली म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. या सोहळ्याच्या आठवणी लिहून काढून जतन करून ठेवाव्यात म्हणून माझा हा लेखन प्रपंच .
आता पर्यंत मनेगावच्या विद्यार्थ्यांचे अनेक गेट टुगेदरचे कार्यक्रम झाले. प्रत्येक कार्यक्रमाचे काही ना काही खास वेगळे वैशिष्ट्य राहीले आहे. प्रत्येक कार्यक्रमात शिक्षक आलटून पालटून तेच ते पण विद्यार्थी मात्र वेगळे वेगळे राहीले आहेत.
” सर, पहीला फोन तुम्हालाच करत आहे. दिवाळीनंतर येत्या सव्वीस आॅक्टोबरला आम्ही आमच्या बॅचचे गेट टुगेदर आयोजित केले आहे. आमच्यासाठी तो दिवस राखून ठेवा. “
महाड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीत इंजिनिअरींग काॅलेजला प्राध्यापक असलेला आमचा माजी विद्यार्थी डॉ.शिवाजी कराडचा फोन आला. त्यानंतर शशिकला सोनवणे ,शरद करडग, भाऊसाहेब पवार आणि इतर विद्यार्थ्यांचेही फोन आले. माजी विद्यार्थ्यांना भेटायला माझे मन नेहमीच उत्सुक असते. विद्यार्थ्यांबरोबर आम्हा शिक्षकांचेही ते गेट टुगेदर असते. कार्यक्रमाला जवळजवळ एक महिन्याचा अवधी होता. एकतीस वर्षांनंतर विद्यार्थी आणि त्यावेळचे आज हयात असलेले शिक्षक एकत्र येणार होते. वेगवेगळ्या गावात आणि वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या मुला मुलींना एकत्र आणणे ही सोपी गोष्ट नसते. मोबाईल फोनमुळे हे काम सुकर झाले असले तरी संयोजकांची कसोटी लागत असते. शाळा मित्र मैत्रिणींना भेटण्याची ओढ प्रत्येकाला लागलेली असली तरी प्रापंचिक विवंचनेतून वाट काढत एकत्र यायला प्रत्येकाला जमतेच असे नाही. एकेका गेट टुगेदरची तयारी विद्यार्थी एकेक दोन दोन वर्षांपासून करत असतात. संयोजकांची चिकाटी , सचोटी आणि सहनशीलता कामी येते. खर्चाचा मेळ बसवला जातो. कार्यक्रमाची रूपरेषा बदलत बदलत अंतीम होते आणि एकदाची तारीख ठरवली जाते. विद्यार्थ्यांना जबाबदारीचे वाटप केले जाते. मग मात्र कधी एकदाचा गेट टुगेदरचा दिवस उजाडतो असे विद्यार्थ्यांना होवून जाते. शिवाजी कराड , शशिकला सोनवणे उर्फ मेघा टर्ले , संपत आंधळे, भाऊसाहेब पवार, ज्योती चौधरी, बेबी सोनवणे उर्फ शितल रमण शिंदे , शरद करडग आणि इतर धडपडे विद्यार्थी यांच्या प्रयत्नांना यश आले. एकदाचा सव्वीस आॅक्टोबर 2025 चा दिवस उजाडला.
सकाळी दहा वाजेपर्यंत मी सटाणा येथून येणारे एस.एम.पाटील सर , निकुंभ मॅडम व खैरनार सर यांची वाट पाहत घरी थांबून राहिलो. रात्रीपासून होत असलेल्या अतीवृष्टीमुळे त्यांना येणे शक्य झाले नाही. बी.आर.पाटील सर पिंपळगावहून येणार होते. पण ते घरी न येता आमच्याही आधी कार्यक्रमस्थळी पोहोचले आणि विद्यार्थ्यांना धावती भेट देऊन आम्हाला न भेटताच निघूनही गेले. मी आणि जे.बी. पगार सर बरोबरच हाॅटेल श्रीनामवर पोहोचलो. शशिकला सोनवणेचे वडील के.पी.सोनवणे सर , 86 वर्षांचे बुजुर्ग हरीभाऊ सुर्यवंशी सर आमच्या आधीच हजर होते. विशेष म्हणजे सुर्यवंशी सर आपल्या आवडत्या स्कुटीने इथपर्यंत आले होते. थोड्याच वेळात बंग सरही आले. पन्नाशीच्या जवळपास पोहोचलेले आमचे माजी विद्यार्थी आमच्या पाया पडत होते. सरांनी आपल्याला नावानिशी ओळखावे ही प्रत्येकाची अपेक्षा असणार. अधूनमधून भेटणाऱ्या विद्यार्थ्यांना मी नावानिशी ओळखतो. पण एकतीस वर्षांनंतर प्रथमच भेटणारे विद्यार्थी ओळखू येत नव्हते. प्रत्येकाच्या डोईस फेटा बांधण्यात आला. नाष्टा झाला , चहा पाणी झाले. एकमेकांच्या भेटीचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता. हळूहळू सर्व विद्यार्थी ओळखू येवू लागले.
आम्हा शिक्षकांची दिमाखात सभागृहात एन्ट्री झाली. दुतर्फा उभे राहत विद्यार्थ्यांनी आमचे उत्स्फूर्तपणे स्वागत केले. एरव्ही कार्यक्रम संपल्यानंतर गृप फोटो काढला जातो. पण आज अगोदरच शिक्षकांसह गृप फोटो काढला गेला आणि कार्यक्रमातून परत जाताना प्रत्येकाला छायाचित्राची एक प्रत देण्याचे नियोजन केले गेले.
सुरूवातीला सुत्रसंचलनाची जबाबदारी शशिकलाने सांभाळली. सर्वात वयस्कर म्हणून एच.बी.सुर्यवंशी सर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. आणि कार्यक्रमास सुरुवात झाली.
नवीनच बांधलेल्या आलीशान सभागृहातील स्टेजवर आम्ही शिक्षक स्थानापन्न झालो. दीप प्रज्वलन , सरस्वती पूजन आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. दिवंगत शिक्षक के.आर.पंडीत सर , भंगाळे सर , पाटोळे सर आणि दिवंगत वर्गमित्र यांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली.
93-94 साली शाळा गावातील गावकीच्या इमारतीत व मारूती मंदिरात भरत होती. बैरागी बाबाच्या घरासमोर सायन्स हाॅल होता. सायन्स हाॅल समोरील मोकळ्या जागेत प्रार्थना व्हायची. प्रार्थना असायची ‘ खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे.’ आजच्या कार्यक्रमात सर्व माजी विद्यार्थी व उपस्थित माजी शिक्षक यांनी उभे राहून ही प्रार्थना म्हटली. प्रार्थनेसाठी पुढाकार घेतला तो शशिकला आणि ज्योती चौधरीने. खुप दिवसांनी साने गुरुजींची ही धर्माचे खरे सार सांगणारी पुर्ण प्रार्थना कानावर पडली आणि कान तृप्त झाले. येथून पुढे कार्यक्रम रंगत गेला. के.बी.ढोली सरही कार्यक्रमास येवून हजर झाले होते. शशिकला आणि भाऊसाहेब पवार दोघांचे सुत्रसंचलन वाखाणण्याजोगे होते. शशिकला स्वतः कवयत्री व उच्च शिक्षीत असल्याने तिच्या बोलण्यात काव्यपंक्ती जास्त असायच्या तर भाऊसाहेब पवार हा विवेकानंदांच्या विचारांनी भारलेला , एक चांगला वाचक व लिखाण करणाऱा , समाजसेवकाचा पिंड असणारा असल्याने त्याच्या बोलण्यात समयसूचकता आणि हजरजबाबीपणा जास्त होता. धोंडवीर वाडीसारख्या छोट्याशा गावात राहणाऱ्या भाऊसाहेबचा मुलगा ओंकार हा इंग्लंडमधील ‘ लिव्हर पुल ‘ युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत आहे. शशिकला ही कवी मनाची असून तिचा स्वतःचा ‘ जिंदगी की कलमे ‘ या नावाचा हिंदी कविता संग्रह प्रकाशित झाला आहे. सायकाॅलाॅजी विषयातील विविध पदव्या प्राप्त करून ती सध्या सायकालाजीस्ट म्हणून काम पाहते आहे. जयपूर , दिल्ली करत ती सध्या इंदूर येथे स्थायिक आहे. तिचे पती टर्ले साहेब खाजगी क्षेत्रात उच्च अधिकारी पदावर कार्यरत आहेत. मुलगा अमेरिकेत शिकतो आहे. माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची यशोगाथा कथन करण्यासारखी होती.
विद्यार्थ्यांच्या हस्ते आपल्या शिक्षकांचा सत्कार हा महत्त्वाचा कार्यक्रम पार पडला. एकप्रकारे हा माजी विद्यार्थ्यांकडून आपल्या आवडत्या शिक्षकांप्रती असणारा कृतज्ञता सोहळा होता. शाल , सन्मानपत्र , विठ्ठल रखुमाईची मुर्ती , मनी प्लांट असणारी कुंडी भेट म्हणून सर्व शिक्षकांना देण्यात आली. गृप गृपने येवून विद्यार्थ्यांनी शिक्षकांबरोबर फोटो काढून घेतले. यावेळी विद्यार्थ्यांचा उत्साह मनाला सुखावणारा होता. सत्कार सोहळा पार पडल्यानंतर विद्यार्थी परीचय सोहळा पार पडला. प्रत्येकाने आपले नाव व सध्या करत असलेले काम सांगितले. घरची कौटुंबिक स्थिती व केलेली प्रगती यांविषयी माहिती दिली. मुलींनी सासर व माहेर दोन्हीकडची नावे सांगितली. कालचे विद्यार्थी आज पालक झाले होते. डॉक्टर, इंजीनियर , शिक्षक , व्यावसायिक, कंपनी कामगार , शेतकरी ,गृहीणी असलेल्यांची मुले त्यांच्याही पुढे जाऊन शिक्षण घेत आहेत तर काहींची मुले मुली नोकरीला लागले आहेत असे दिसून आले. काही जण आजोबा बनण्याच्या मार्गावर तर काही मुली आता सासू बनल्या आहेत. गरीबीत शिक्षण घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांची आर्थिक परीस्थिती आता सुधारलेली आहे हे ही लक्षात घेण्यासारखे आहे. हा सर्व परिणाम शिक्षणाचा आहे. शाळा शिकत असताना शिक्षकांच्या हातचा खाल्लेला मार आणि शिक्षकांनी केलेली शिक्षा काहींना आठवली. ‘ छडी लागे छमछम विद्या येई घमघम ‘ या म्हणीची आठवण झाली. काहींना खुप बोलावेसे वाटत होते तर काहींना दोन शब्द बोलणेही मुश्कील होत होते.
गेट टुगेदर हा कार्यक्रम खऱ्या विद्यार्थ्यांचाच असतो. लहानपणीच्या शाळा मित्रांना भेटायला, त्यांची आजची परिस्थिती जाणून घ्यायला सर्व जण उत्सुक असतात. विद्यार्थ्यांचे जीवन सर्वच अर्थाने बदलून गेलेले असते. सेवानिवृत्ती सोडून शिक्षकांच्या जीवनात फारसा बदल घडलेला नसतो. विद्यार्थ्यांचे मनोगत ऐकायला मला आवडते. शिक्षकांच्या भाषणांपेक्षा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे असे मला वाटते. काही गेट टुगेदर मी असे पाहिले की विद्यार्थी बोलायला तयारच होत नाहीत. पण आजचा कार्यक्रम या गोष्टीस अपवाद ठरला. भरपूर विद्यार्थी आणि तेही भरपूर वेळ बोलले. सर्व जण भुतकाळाच्या आठवणीत रममाण झाले होते.
विद्यार्थी मनमोकळेपणाने आपले मनोगत व्यक्त करत होते. बोलता येणे ही सुद्धा एक कला आहे. काहींना ती जमते ,काहींना ती जमंत नाही. कमी बोलणाऱ्यांची अधिक माहिती भाऊसाहेब पवार आणि शशिकला सोनवणे आपल्या सुत्रसंचलनाच्या कलेतून व्यक्त करायचे. विद्यार्थ्यांनी आपल्या बोलण्यातून शालेय आठवणींना उजाळा दिला. शिक्षकांविषयीच्या काही आठवणी जाग्या केल्या. शिक्षकांविषयीची कृतज्ञता व्यक्त केली. ज्योती चौधरी ही चौधरी गुरूजींची मुलगी. तिचे वडील चौधरी गुरूजी ही मनेगाव प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ज्योती आता चाळीसगावला राहते. भडगाव तालुक्यातील एका प्राथमिक शाळेत ती मुख्याध्यापक पदावर आहे. सुनीता फडने आपल्या बोलण्यातून सगळ्यांची मने जिंकून घेतली. पती निधनानंतर मोठ्या धिराने आपल्या संसाराचा गाडा तिने सांभाळून आपल्या मुलांना मोठे केले. पती बिएसटी मुंबई येथे होते. तिला अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळाली. शिकण्याचा फायदा तिला झाला. ती आज चांगल्या पदावर काम करत आहे. खडक माळेगावच्या सुनिताची कहानीही अशीच प्रेरक आहे. शेती व्यवसायात अनेक प्रयोग करत या व्यवसायातही प्रगती करून पैसा व मान मिळवता येतो हे तिने व तिच्या पतीने सिद्ध करून दाखवले आहे. शिवाजी कराड हा पाटोळे या खेडेगावचा विद्यार्थी. नुतन जवाहर विद्यालय मनेगाव या शाळेतील एक आदर्श विद्यार्थी. दहावीच्या परीक्षेत सिन्नर केंद्रात पहील्या पाचमध्ये तर इंग्रजी विषयात तालुक्यात पहीला आला होता. मनेगाव शाळेत पहीला आला म्हणून तेंव्हाचे सरपंच बजुनाथ शेठ सोनवणे यांनी बक्षीसासाठी ठेवलेली सायकल त्याने जिंकली होती. इंजिनिअरींग मध्ये चंदीगड विद्यापीठातून पीएचडी मिळवणारा या शाळेतील तो पहिला विद्यार्थी. आजचे गेट टुगेदर कार्यक्रम घडवून आणण्यात त्याचा सिंहांचा वाटा होता. त्यानेही अनेक आठवणींना उजाळा दिला. गोंदे या गावातील मळ्यात झालेल्या स्काऊट गाईड कॅम्पच्या आठवणी जागवल्या. मंगल सोनवणे उर्फ पवार सोनांबे येथे राहणारी हिनेही मोठे भावनिक भाषण केले. घरात भाऊच्या मृत्यूमुळे दु:खाचे वातावरण असुनही मन मोठे करून ती कार्यक्रमाला आली होती. मंगल मंडलिक उर्फ जेजुरकर या नायगावचे सासर असलेल्या विद्यार्थ्यीनीचेही भाषण चांगले झाले. शशिकला सोनवणे उर्फ मेघा टर्ले हीने आपल्या यशस्वी जीवनाची वाटचाल कथन केली. वडील के.पी. सोनवणे सर हे मराठीचे शिक्षक. शशिकलाने इंजिनिअरींग मध्ये शिक्षण घेतले. हिंदी विषयात कविता लेखन करत ‘ जिंदगी की कलमे ‘ हे पुस्तक प्रकाशित केले आहे. सुर्यवंशी सरांच्या चेतक स्कुटीची आठवण काहींनी काढली तर काहींना बंग सरांचे हिंदी विषयाचे अध्यापन आठवले. मला स्वतःलाही बंग सरांचे हिंदी बोलणे खुप आवडायचे. काहींनी पगार सर व माझ्या अतुट दोस्तीची प्रशंसा केली. तळहातावर छडी देण्यापूर्वी मी तळहाताखालून छडी देत असे याची आठवण एकाने सांगितली. बी.आर.पाटील सर , एस.एम.पाटील सर ,कै.भंगाळे सर यांच्याही आठवणी निघाल्या. आजचा कार्यक्रम घडवून आणण्यात शशिकलाचाही मोलाचा हिस्सा राहीला आहे. शशिकला , शिवाजी , ज्योती चौधरी हे बाहेरगावी राहतात. पण धोंडवीर येथे राहणाऱ्या भाऊसाहेब पवार व सिन्नर येथे राहणारे संपत आंधळे , निलेश सोनवणे, मनेगाव येथील शरद करडग यांनी गेट टुगेदर साठी पुढाकार घेतला व कार्यक्रम यशस्वी करून दाखवला. दिपक जाधव, सुनील गणपत सोनवणे, गोरख सोनवणे, रामनाथ करडग यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परीश्रम घेतले. दिवाळीचा मुहूर्त धरण्यात आयोजकांनी औचित्य दाखवले. अनायसे सुट्ट्या होत्या. लेकीबाळी माहेरी आलेल्या होत्या. नोकरीसाठी बाहेरगावी गेलेले विद्यार्थी आपल्या मातृगृही आले होते. एकतीस वर्षांनंतर एकत्र येत विद्यार्थी मित्रांनी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली.
विद्यार्थी मनोगतानंतर शिक्षकांची भाषणे झाली. ‘ नकोसे झालेले ओझे मग ते भौतिक असो अगर मानसिक , टाकून द्यायला पाहिजे ‘ हे त्यांनी एका बोधकथेद्वारा पटवून दिले. बंग सरांनी हिंदीत बोलावे अशी सर्वांची अपेक्षा होती. पण शिक्षकी पेशा सोडून खुप वर्षे झाली असल्याने त्यांना ते जमले नाही व त्यांनी मराठीतून आपले मनोगत व्यक्त केले. पगार सरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अहिराणी भाषेत ‘ मन्ह गाव ‘ या शब्दाचा अर्थ म्हणजे माझे गाव असा होतो. मन्हंगाव म्हणजेच मनेगाव होय. मी माझ्या भाषणात मनेगावातील दानशूर व्यक्तींचा उल्लेख केला. त्यामध्ये कै. श्रीराम शिंदे , कै. केरूशेठ सोनवणे ,कै. बजूनाथ शेठ सोनवणे , पुणे स्थित रमण शिंदे आणि शितल शिंदे ही पतीपत्नींची जोडी यांचा समावेश होता. विशेष म्हणजे या सर्व दानशूर व्यक्तींचे वंशज आजच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थी म्हणून हजर होते. श्रीराम शिंदे साहेबांचा मुलगा प्रमोद शिंदे जो आज डोंबिवली येथे पोलीस आहे ,केरू शेठचा नातू निलेश सोनवणे हा मुसळगाव एमआयडीसीत एका प्रख्यात कंपनीत मॅनेजर आहे. रमण शिंदेची पत्नी बेबी सोनवणे उर्फ शितल शिंदे आजच्या कार्यक्रमात सहभागी होती. गेल्या विस वर्षांपासून ते दरवर्षी शाळेतील पन्नास विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांपासून ते फी ,कपडे सर्व प्रकारची मदत करत असतात. त्यांच्या दातृत्वाची चर्चा सर्वत्र होत असते. शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त काढलेल्या ‘ प्रज्योत ‘ या अंकात यशस्वी विद्यार्थी म्हणून या बॅचचे विद्यार्थी शिवाजी कराड , शशिकला सोनवणे , निलेश बाळकृष्ण सोनवणे यांचे फोटो आहेत. रमण शिंदेचा फोटो आहे. प्रज्योत अंकात काहींचे लेख आहेत. एकंदरीत 1993-94 ची बॅच नु.ज.वि.मनेगाव शाळेची हुशार मुलांची बॅच म्हणून ओळखली जाते. प्रज्योत अंकात शाळेला मदत करणाऱ्या दानशूरांचे फोटो आहेत. वेळेअभावी आम्हा शिक्षकांना जास्त बोलता आले नाही. के.पी. सोनवणे सर खुप वेळ बोलतात. पण आज त्यांनी वि.वा.शिरवाडकरांची एकच कविता
‘ कणा ‘ चा उल्लेख केला आणि आपले भाषण आटोपते घेतले. सुर्यवंशी सरांसह सर्वांनी मनेगाव गावाचे व शाळेचे ऋण मान्य केले. साडेतीन वाजत आले होते. दुपारच्या जेवणाची वेळ केंव्हाच टळून गेली होती. भुतकाळातील लहानपणीच्या आठवणीत रममाण झालेली मुले मुली आणि शिक्षक तहाणभुक विसरून गेले होते.
श्रीनाम हाॅटेलमध्येच सुग्रास भोजनाचा बेत आयोजित केला होता. विद्यार्थ्यांसह सहभोजनाचा आनंद आम्ही घेतला. जेवणाला उशिर झाला होता. कार्यक्रम लवकर सुरू केला असता तर सर्व गोष्टी वेळेवर झाल्या असत्या. विद्यार्थी आमच्या जेवणाची व्यवस्था पाहत होते. जेवण झाल्यावर परत एकदा सर्व विद्यार्थ्यांबरोबर गप्पा गोष्टी केल्या. रामभाऊ काळोखे , रतन पवार , सुनील मुरकुटे , डॉ.सदानंद खताळे, रामनाथ करडग ,कोंड्याबाई खताळे , अलका खताळे, आरूणी सोनवणे, रूपवते , संपत आंधळे अशा कितीतरी मुला मुलींशी बोलणे झाले. सगळ्यांची नावे घेणे प्रशस्त होणार नाही. गैरसमज नसावा. सर्वांनी आम्हाला निरोप दिला. आठवणीने आमच्या भेटवस्तू आमच्या सुपुर्द केल्या.
जेवण झाल्यानंतर आणि शिक्षक निघून गेल्यावर विद्यार्थ्यांनी धमाल केली. विद्यार्थी वयाने कितीही मोठे झाले तरी आपल्या शिक्षकांसमोर मौजमस्ती करायला घाबरतात ,लाजतात. शालेय जीवनात ठराविक शिक्षकांचा एक विशेष पगडा विद्यार्थ्यांवर बसलेला असतो आणि तो कायम राहतो. इतक्या वर्षांनंतरही विद्यार्थ्यांनी दाखवलेला आदरभाव आम्हा शिक्षकांसाठी कोणत्याही संपत्ती पेक्षा कमी नाही. शिक्षक व्यवसायातून भले आम्हाला संपत्ती कमावता आली नसेल पण कुणालाही हेवा वाटावा असे विद्यार्थ्यांचे प्रेम आणि आदर आम्हाला मिळतो. मी आजही व्हाट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या संपर्कात राहतो. त्यांच्या कौटुंबिक सुखदुःखात होता होईल तेवढा सहभागी होतो.
आम्ही गेल्यानंतर विद्यार्थी संगीत खुर्ची आणि विविध खेळ खेळले. आपले पद प्रतिष्ठा विसरून एकमेकांत मिसळून आनंदाने विविध उपक्रम साजरे केले. सहा
वाजेपर्यंत सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र होते . त्यानंतर त्यांनी एक सामाजिक उपक्रम राबविला. ठाणगाव येथील अनाथाश्रमातील मुलांना पुरणपोळीचे सुग्रास जेवण देण्याचे नियोजन त्यांनी केले होते. सहा वाजेनंतर तीन चार गाड्या घेऊन ते ठाणगावला गेले. जाताना सिन्नरहून खापरावरचे मांडे , रशी भात ,भजी कुरडया घेऊन गेले. पाऊस चालू होता , अंधार पडला होता. तरीही ठाणगावला जावून तेथील अनाथ मुलांना स्वतःच्या हाताने वाढून जेवू घातले. एवढेच नाही तर अनाथाश्रमाला पांच हजार रुपयांची देणगीही दिली. आता पर्यंत झालेल्या स्नेह सम्मेलनात विविध उपक्रम राबविले गेले आहेत. पण समाजभान दर्शवणारा आजचा कार्यक्रम मला विशेष भावला.
आजपर्यंत अनेक संमेलनांना हजर राहण्याचे भाग्य मला लाभले आहे. माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची भेट , त्यांच्याशी केलेला संवाद हाच आमच्यासाठी आनंद सोहळा असतो. एक एक स्नेहमेळावा आमचे आयुष्य एक एक वर्षाने वाढवितो अशी माझी भावना आहे. असे स्नेह मेळावे सतत होत राहोत आणि विद्यार्थ्यांचा सहवास आम्हाला सतत लाभत राहो हीच सदिच्छा बाळगून या लेखाला मी पुर्ण विराम देतो.
गोविंद बभुता मोरे सर
सेवानिवृत्त मुख्याध्यापक
सिन्नर (चौगांवकर)
9588431912
p
.
