
लासलगाव, दि. 31 ऑक्टोबर (प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने देशाचे प्रथम गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची १५० वी जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ म्हणून तर देशाच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांचा ४१ वा स्मृतीदिन ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. भारताचे पहिले उपपंतप्रधान आणि पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त दरवर्षी 31 ऑक्टोबर हा राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. भारताची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून या दिवसाकडे पाहिले जाते. तर इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून पाळण्यात येते.
संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर यांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे, उपप्राचार्य डॉ.सोमनाथ आरोटे, कार्यालय अधीक्षक श्री.रविंद्र होळकर, रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा.सुनिल गायकर यांच्यासह कार्यालयीन कर्मचारी व रा.से.यो. स्वयंसेवक उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांनी सरदार वल्लभभाई पटेल व इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
