
नाशिक, (प्रतिनिधी ) दि. २६ :मराठी भाषेचा प्रचार-प्रसार, वाचनसंस्कृतीचा विकास आणि “वाचाल तर वाचाल” या संकल्पनेचा जागर निर्माण करण्यासाठी गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने यंदा दिवाळी विशेष उपक्रम राबविण्यात आला. बागलाण, कळवण, सुरगाणा, दिंडोरी आणि साक्री या तालुक्यांतील तब्बल १०० गावांमध्ये ‘साहित्यफराळ’ वाटप करून प्रतिष्ठानने ग्रामीण भागात वाचनप्रेमाची ठिणगी पेटवली.

अनेक संस्थांच्या वतीने दिवाळीत फराळ वाटपाचे उपक्रम होत असताना, गिरणा गौरव प्रतिष्ठानने साहित्याचा फराळ वाटून एक वेगळी दिवाळी साजरी केली. मंदिरांच्या ओट्यांवर, सभामंडपात, चावडीवर, पारावर बसलेल्या तरुण, वयस्क आणि ज्येष्ठ नागरिकांना विविध दिवाळी अंक, विशेषांक, कविता संग्रह, व्यक्तिचरित्र, शेती, आरोग्य, कला, क्रीडा आणि महिला विषयक अंक वाटण्यात आले.

या माध्यमातून संस्थेने “दिसामाजी रोज वाचा आणि उजाड माळरानावर एक झाड लावा” हा सुंदर संदेश दिला. प्रत्येक गावात या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळाला असून वाचकांनी “हाती पुस्तक मिळाल्याचा आनंद” व्यक्त केला.

या साहित्य फराळ वाटप अभियानात शिवाजी कोल्हे, गोकुळ चौरे, पुष्पलता पाटील, नंदकिशोर शेवाळे, रमेश पाटील, शितल कुयटे, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, गणेश गायकवाड, गणपत चौरे आणि बापूसाहेब शेवाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा अभिनव उपक्रम यशस्वी ठरला असून गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
