
नांदगाव, दि. २५ ऑक्टोबर २०२५ —(प्रतिनिधी)
सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट (Seth Hirachand Nemchand Smarak Trust), स्थापन दिनांक २ ऑगस्ट १९५४, रजिस्ट्रेशन क्रमांक PTR E-1634 (मुंबई) या सार्वजनिक ट्रस्टने पुण्यातील मॉडेल कॉलनी परिसरातील तीन एकर मौल्यवान जमीन बेकायदेशीर पद्धतीने विक्री केल्याचा आरोप जैन समाजाने केला आहे.
सदर विक्रीबाबत जिल्हाधिकारी नाशिक यांना सकल जैन समाज नांदगावच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. समाजाच्या मते, ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाने धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र शासनाकडे खोटी व दिशाभूल करणारी माहिती देऊन जागा विक्रीसाठी परवानगी मिळवली आहे.
१९६० पासून या जागेवर “शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंग” या नावाने जैन विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह चालविले जात होते. मात्र, इमारत जीर्ण झाल्याचे कारण देत विश्वस्त मंडळाने १३ फेब्रुवारी २०२५ रोजी धर्मदाय आयुक्तांकडे विक्रीची परवानगी मागितली होती. धर्मदाय आयुक्तांनी ४ एप्रिल २०२५ रोजी ती परवानगी दिल्यानंतर, ट्रस्टने १५ मे २०२५ रोजी गोखले बिल्डर्स यांच्याशी ३११ कोटी रुपयांचा करार केला.
करारानुसार विकसकाकडून २३० कोटी रुपये रोख स्वरूपात देण्यात येणार असून उर्वरित ८१ कोटी रुपयांच्या बदल्यात ट्रस्टला दहा गुंठे क्षेत्र आणि ४० हजार स्क्वेअर फूट बांधकाम ९९९ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात येणार आहे.
समाजाने या विक्रीला “लबाडीचा व्यवहार” म्हणत ती रद्द करण्याची मागणी केली आहे. अर्जात म्हटले आहे की —
“ट्रस्टच्या घटनेनुसार कोणालाही संस्थेची मालमत्ता विकण्याचा अधिकार नाही. आर्थिक अडचणी आल्यास समाजाकडे देणगी मागण्याचे पर्याय उपलब्ध असून, ते न वापरता वैयक्तिक फायद्यासाठी जागा विकली गेली आहे.”
तसेच, ट्रस्टच्या ताळेबंदात मागील दोन वर्षांत १४ कोटी रुपयांची रक्कम “इतर कापणी” म्हणून दाखविल्याबद्दलही समाजाने संशय व्यक्त केला आहे. कोणतेही स्ट्रक्चरल ऑडिट न करता इमारत मोडकळीस आल्याचे दाखवण्यात आले आणि त्या आधारावर परवानगी घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
याच परिसरात असलेले १००८ श्री भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर, जे ६५ वर्षांपासून अस्तित्वात आहे, त्याचे अस्तित्वही डावलण्यात आल्याचा आरोप आहे.
मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणावर याचिका दाखल असतानाही, ८ ऑक्टोबर २०२५ रोजी विश्वस्तांनी गोखले बिल्डर्ससोबत अंतिम खरेदीखत केले. त्याच दिवशी विकसकाने बुलढाणा अर्बन बँक व बिरेश्वर पतसंस्था यांच्याकडून ७० कोटी रुपयांचे कर्ज घेत संपत्ती गहाण ठेवली असून, मंदिरही गहाण ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे.
सकल जैन समाजाने जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे की,
- सदर विक्री व्यवहार तातडीने रद्द करावा,
- कोणत्याही प्रकारे नवीन परवानग्या देऊ नयेत,
- दोषी विश्वस्तांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत,
- आणि जागेची व इमारतीची यथास्थिती राखण्यासाठी तातडीचे आदेश द्यावेत.
समाजाने पोलीस विभागातही लेखी तक्रार दिली असून, तरीही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे सांगण्यात आले आहे. विकसकांकडून बोर्डिंगची इमारत पाडण्याची तयारी सुरू असल्याने महत्त्वाचे पुरावे नष्ट होण्याचा धोका असल्याची भीती समाजाने व्यक्त केली आहे.
