
सिन्नर. ( प्रतिनिधी )’ इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो’ ‘सत्य की जय हो’ या जयघोषांत ‘बळीराजा गौरवदिन मिरवणूक’ काल (बुधवार, दि. २२ ऑक्टोबर २०२५) अकोले शहरात सालाबादप्रमाणे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. अकोले तालुक्याच्या सांस्कृतिक इतिहासात या मिरवणुकीला मानाचे स्थान आहे. बळीराजा गौरव समितीच्या वतीने या मिरवणुकीचे आयोजन केले जाते.

अकोले शहरातीलच नव्हे तर संपूर्ण तालुकाभरातून बहुसंख्येने रयत या मिरवणुकीत सहभागी होत असते. यंदा सिन्नर, नाशिक, पुणे, मुंबई, अहिल्यानगर येथूनही बळीराजाप्रेमी रयतेने मिरवणुकीला हजेरी लावली. अकोले शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रतिकात्मक बळीराजाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीस सुरुवात झाली. आमचा मित्र वीरेंद्र मेढे हा प्रतिकात्मक बळीराजा झाला होता. मिरवणुकीच्या मार्गावर ठिकठिकाणी बळीराजाला ओवाळण्यात आले. चिमुकले तर फटाक्यांची माळ लावून बळीराजाचे स्वागत करत होते. तरुणांनी ‘ संविधानाने आम्हाला काय शिकवलं?’ या विषयावर एक सुंदर पथनाट्य ठिकठिकाणी सादर केले. विविध संतांनी बळीराजाबद्दल लिहिलेले वाक्ये तसेच सामाजिक संदेश लिहिलेले फलक आबालवृद्धांनी हातात धरले होते.

मिरवणुकीच्या मार्गावर तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमांना बळीराजाच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. मिरवणुकीचा समारोप जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात झाला. यावेळी काही नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले. एकूणच अकोलेकरांनी सिंधू संस्कृतीचा जनक, कृषीसंस्कृतीचा प्रवर्तक, श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कर्ता, जलसंधारण व सिंचन व्यवस्थेचा आद्यप्रवर्तक, सत्यप्रिय, समतावादी, संपत्तीचे समन्यायी वाटप करणारा, सरकारी भांडारातून सबसिडी देणाऱ्या धोरणाचा जनक परंतु वामनाने ज्याला कपटाने पाताळात गाडले त्या महाबली बळीराजाच्या आठवणींना या गौरवदिनाच्या निमित्ताने उजाळा दिला.- संदेश कासार, अकोले
