
पळसे येथे राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानच्या ‘कविता मनामनातल्या’ कार्यक्रमात कविता सादर करताना युवाकवी प्रशांत केंदळे. समवेत कवी राजेंद्र उगले, रवींद्र मालुंजकर, शरद आडके.
नाशिकरोड. (प्रतिनिधी )
झगमग करते गावच अवघे*
घराघरांची असे दिवाळी…
सुरेल होतो किती पाडवा
सप्तसुरांची असे दिवाळी…
युवाकवी प्रशांत केंदळे यांच्या गेय रचनेसह चतुरस्त्र अभिनेते आणि कवी राजेंद्र उगले, निवेदक रवींद्र मालुंजकर आणि सहभागी नवोदित कवींनी पळसे येथील राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानने पळसे-नानेगाव चौफुलीवरील नवले लॉन्सच्या हिरवळीवर सतत तिसऱ्या वर्षी दीपावलीनिमित्त आयोजित ‘कविता मनामनातल्या…’ या काव्यमय ‘पाडवा पहाट’ मैफिलीत रंग भरले. दिवाळीच्या चैतन्यदायी वातावरणात, अगोदरच्या रात्री पडलेल्या पावसामुळे वाढलेला गारवा आणि पहाटेच्या गुलाबी थंडीत गावखेड्यातील शेतीमातीत राबणाऱ्या रसिकांच्या उदंड उपस्थितीने रंगलेल्या मैफिलीत कवी राजेंद्र उगले यांनी दीपावलीच्या दिव्याचे महत्त्व आपल्या व्यक्तिमत्त्वाशी सांगड घालून देताना
आतूनच काळी । कंदिलाची काच
प्रकाशाचा नाच। थांबतो रे।।
*काचेला पुसावे। तैसा पुसा देह।
नाहीच संदेह । उरे मग ।।
अशा शब्दात जीवनाचे प्रयोजन सांगत मैफिल उंचीवर नेली. दोन्ही कवींच्या आशयसंपन्न कवितांसह कवयित्री लीलाताई गायधनी, युवाकवी शरद आडके, समाधान गायधनी, डॉ.संजय पवार, सुनील आगळे, गेणूजी गायधनी, रामचंद्र शिंदे, तुषार गडाख यांनीही कविता सादर केल्या. कवी रवींद्र मालुंजकर यांनी निवेदन करताना सादर केलेल्या अनेक कवितांनी रंग भरले.
नासाकाचे माजी व्हा.चेअरमन जगन्नाथ आगळे, पळसे ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष विष्णुपंत गायखे, नाशिक तालुका शेतकी संघाचे सभापती शरद गायखे, कामगार नेते नामदेव गायधनी, अशोक गायधनी, प्रशांत कापसे, प्राचार्य रामदास गायधनी, नवले लॉन्सचे संचालक योगेश नवले, पळसे गावच्या सरपंच ताराबाई गायधनी, सदस्य शोभाताई गायधनी, जाखोरीचे उपसरपंच राहुल धात्रक, धनसमृद्धी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन शामराव गायधनी, पळसे गावचे माजी सरपंच नवनाथ गायधनी, दीपक गायधनी, माजी उपसरपंच सुनील गायधनी, दिलीप गायधनी, धीरज मुठाळ, दत्तात्रय शिंदे, नानेगावचे माजी सरपंच संजय आडके, सुखदेव आडके, अर्जुन वाजे, विलास गायधनी, नानासाहेब सरोदे, ज्ञानेश्वर गायधनी, अमोल आगळे, रंजन चौधरी, ग्रामाभिमान मंचचे अध्यक्ष प्रमोद गायधनी, सदस्य निलेश गायधनी, ॲड.सोपान गायधनी, नंदू गायधनी, प्रा.योगेश गायधनी, डॉ.संजयकुमार गायधनी, प्रताप गायधनी, दशरथ आडके, संदीप आडके, मोतीराम तिदमे, कृष्णा सोनवणे, गणपत गायधनी, सतीश गायधनी, लक्ष्मण जाधव, सचिन गायधनी, होनाजी गायधनी, महेश गायधनी, भाऊसाहेब जाधव यांसह पळसे पंचक्रोशीतील महिलांसह रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित रसिकांमधून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमधील २५ भाग्यवान विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते ग्रंथभेट देण्यात आली. राज्यकर्ता युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय गायधनी, दिलीप गायधनी, तुषार गायधनी, शरद तिदमे, अविनाश गायधनी, तुषार गडाख, सुनील गायधनी, रवींद्र गायधनी, श्रीकांत गायधनी, महेश जाधव, रोहित गायधनी, आदित्य गायधनी आदींनी संयोजन केले. प्रमुख संयोजक संतोष गायधनी यांनी आभार मानले.
