
लेखक:- नवनाथ अर्जुन पाटिल गायकरआहुर्ली, ता.ईगतपुरी, जि.नाशिकमो.नं.९८८१३२९७०९:-
आमच्या घरात आणि गावात ही स्वाध्याय परिवाराचे व वारकरी संप्रदायाचे चांगलेच बीजारोपन झालेले आहे. त्यामुळे या दोहोचेंही संस्कार आमचेवर बालपणापासुनच झालेले आहे. स्वाध्याय हा काहि कुठला व्यक्तीपुजक वा मुर्तीपुजक असा पंथ नाही.किंवा कुठेही, किंचितही अंधश्रद्धेला खतपाणी देणाराही पंथ नाही. स्वाध्याय ही एक वैचारीक घुसळण आहे.असार बाजुला काढुन सार किंवा सारासार विचारांची लागवड मानवी आचरणात करणारी एक सुप्त अशी चळवळ आहे. माणुस नावाच्या प्राण्याचं ८४ लक्ष प्राण्यापैकी एकमेव वैशिष्टय़ म्हंणजे त्याला मन आहे, बुद्धी आहे आणि विचार करण्याची त्याची कुवत दांडगी आहे.नुसता विचारच नाही तर तो विचार कृतीत उतरवण्याचीही अफाट शक्ती त्याचेकडे आहे. पण कधी कधी नुसती साधन वा शक्ती असुन चालत नाही तर तिला योग्य ते वळण असणं गरजेचं आहे.तिचा वापर योग्य व अचुक होणं गरजेचं आहे.आणि या साठीच धर्माचा उदय झाला. आता धर्म आला म्हंणजे त्याचं वैचारीक अध्ष्ठाण हे यायलाच हवं. किंवा सोप्या भाषेत त्याला तत्वज्ञानाची जोड ही हवीच.तशी ती सनातन हिंदु धर्माला आहे. जगाच्या पाठिवर लाखो वर्ष जुना असा इतिहास व परंपरा असलेला हा वैदिक धर्म आहे.या धर्माइतका पुरातन धर्म,संस्कृती वा परंपरा क्वचितच एखाद दुसरी आहे. या धर्माचं वैशिष्टय म्हंणजे धर्माच तत्वज्ञान खुद्द परमेश्वराने सांगितलं आहे. जगाच्या पाठिवर आजमितीला उदयास आलेले, अस्तित्वात असलेले झाडुन सर्वच कथीत धर्म किंवा पंथ यांचे तत्वज्ञान हे त्या त्या धर्म वा पंथाचे उपासकानीं जगाला सांगितले आहे.पण वैदिक धर्म हा एकमेव असा धर्म आहे कि ज्याचे मार्गदर्शन किंवा तत्वज्ञान हे परमेश्वराने खुद्द कथन केलेले आहे. धर्माचे हे तत्वज्ञान कालांतराने धर्म उपासक व अनुयायानीं आजतागायत झिरपवत आणले आहे.वेळोवेळी यावर धुळ साचली,पुटे चढली तेव्हा ती साफ करुन तत्कालीन कालखंडा प्रमाणे साज चढवुन,त्यास सहज सोपे समजेल अशा भाषेत रुपांतरित करुन ते ज्ञानामृत समाजाला पाजले आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्रावर ऐन युद्ध प्रसंगी कर्मच्युत होऊ पाहणार्या यौद्ध्यास अर्जुनास कर्म सिद्धांत सांगितला.हे तत्वज्ञान म्हंणजेंच श्रीमद्भगवद्गीता होय. संत ज्ञानेश्वर माऊलीनी ही श्रीमद्भगवद्गीता प्राकृत भाषेत सोपी करुन सांगितली. लोकमान्य टिळकानीं गीतारहस्य हा ग्रंथ लिहला. हेच तत्वज्ञान स्वाध्याय परिवाराचे प्रणेते परमपूज्य आदरणीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी जगासंमोर सहज सुलभ पद्धतीने कर्म सिद्धांत रुपात मांडला. हा काही पंथ नाही,कुठला भक्तमेळा वा दरबार नाही तर निष्काम विचाराने वैचारीक देवाणघेवाणीचा हा एक आनंद पर्व सोहळा आहे. गीतेचे सार सहज सोप्या भाषेत समाजाला देण्याचे महान काम या स्वाध्याय परिवाराने केले आहे. जगाचे पाठीवर हा असा एक भक्ती परिवार आहे जो निस्वार्थ भावनेने भगवंताचे महान कार्य करतो.कुणाकडुनही एक रुपयाची देणगी नाही, पावती नाही.कसली वसुली नाही.कसला डामडौल नाही.कुठली प्रसिद्धी नाही कि कुठला गाजावाजा नाही. तरीही स्वाध्याय चे विचार गावोगावी, खेडोपाडी, वाडी वस्तीवर पोहचले आहेत. आणि या विचारातून किती तरी माणसं व कुटुंबे घडली आहेत. कुणाचे खायचे नाही, प्यायचे नाही.कुणाचा रुपया ही न घेता घरची भाकर बांधुन भगवंताचे विचाराचे कार्य घरोघरी पोहचवण्याचे साधे वाटणारे, पण अतिशय महान असणारे कार्य हा परिवार करत आहे हे खचितच भुषणावह आहे. आज धर्माला बाजाराचे, उत्सवाचे स्वरुप प्राप्त होतानां दिसते आहे.मनातला श्रद्धेचा भाव जाऊन बाजारी मुल्यावर आधारीत भाव प्राप्त होतानां दिसतो आहे.धर्माचे नावाखाली द्वेष, हिंसा केली जात आहे.संघर्ष टिपेला पोहचतानां दिसतो आहे.अशा कालखंडात स्वाध्याय चे कार्य म्हंणजे एक आशेचा किरण आहे. पैशावर आधारीत व्यवस्था आज उभी राहिली आहे.या शिवाय जगणे पावलोपावली अशक्य आहे.अशा कालखंडात विना पैसा स्वाध्याय परिवाराचे काम चालते हे अद्भुत व जगातले आठवे आश्चर्य आहे. मनुष्य देहाचा गौरव ही संकल्पनाच किती सुंदर आहे. मानवी देहाचं मुल्य माणसालाच कळु नये हे किती दुर्दैवी आहे ? आज माणसं या बहुमुल्य देहाचा वापर कसाही करत आहे. व्यसनाधीन होऊन हे शरीर खराब करत आहे, नष्ट करत आहे.नको त्या अपेक्षा ठेऊन त्या सफल न झाल्या तर नैराश्य पावत आहे.यातुन आत्महत्या करत आहे. आज असे मनाचे असंख्य रोगी आपल्या आसपास वावरत आहे. आपणास ते कळतही नाही. स्वाध्याय परिवार किंवा स्वाध्याय चे विचार हे त्यावरचे गुणकारी व परिणामकारक औषध आहे. काम करीत जा, हाक मारीत जा हा कर्म सिद्धांत स्वाध्याय विचाराचा पाया आहे.आपण नेमके कर्म सिद्धांत विसरलो आहोत. कर्म करत जा, व्यर्थ फलाची चिंता नको हे श्रीमद्भगवद्गीता आपल्याला हेच सांगते. “ए अर्जुना, तु फक्त तुझे कार्य करत रहा.फलाची व्यर्थ चिंता करु नको.कर्म केले तर फल नक्कीच मिळेल.” पण आज आपण नेमके कर्म विसरलो आहे.कर्म करत नाही. किंवा कर्म केले कि अमुक तमुक फलाची अपेक्षा करतो.आणि इच्छित फल प्राप्त झाले नाही कि मग व्यर्थ शोक करतो. दु;ख करतो.यातुन विनाकारण आपण रोगाची उत्पत्ती करतो.आणि यातुन मग मौल्यवान देहाची नासाडी करतो किंवा त्यास स्वहस्ते दु;ख प्रदान करुन पीडा उत्पन्न करतो. मानवी जीवनात कर्माचा सिद्धान्त सांगताना भगवंत त्याला स्थितप्रज्ञतेची जोड देतात. ही स्थितप्रज्ञता मानवी जीवनात अती आवश्यक आहे. भगवंताचे चरित्र या स्थितप्रज्ञतेचे उत्तम उदाहरण आहे.पण ही स्थितप्रज्ञता मानवी जीवनात अंगिकारणे हाच स्वाध्याय विचार आहे.या विचारापासुन माणसं दुर ढळत चालली आहे. मानवी जीवनाला या कर्मावर आधारीत फल अपेक्षा विरहीत स्थितप्रज्ञता सिद्धान्ताची व पर्यायाने स्वाध्याय विचाराची आज नितांत गरज आहे. भरकटलेले मानवी तारु तेव्हाच किनार्यास लागेल
