
*-II वसु बारस II-*
लेखक :-. अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी ता. मालेगाव (नाशिक)*
*स्वदुग्धे सदा पोशिते जी जगाला I*
*स्वपुत्रास दे जी कृषी चालवाया I*
*नमस्कार त्या दिव्य गो देवतेला II*
दीपावली ही अश्विन कृष्ण द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीयेपर्यंत म्हणजे वसूबारसेपासून भाऊबीजेपर्यंत असते. प्रारंभीलाच बसूबारस कापूर्वजांनी ठरवली असेल ह्याचा आज आपण या लेखाद्वारे परामर्ष घेण्याचा प्रयत्न करूया.
★ बसुबारस अश्विनकृष्ण द्वादशीलाच का ? ह्याचा अभ्यास करतांना असे लक्षात आले की सर्वसाधारणपणे गायींच्या प्रसुतीकालावधी हा नारळीपौर्णिमा ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत असतो. प्रत्येक शेतकऱ्याकडील गो-धन या काळात पूर्णतः दूधात असते. या काळात निसर्गच इतका अनुकूल असतो की कुरणांमध्ये गवताची वाढ जवळजवळ पूर्ण झालेली असते, माजराचारा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. बांधावर गवतसुद्धा पुर्ण वाढलेले असते. अशा सर्व प्रकारचे गवत खाऊन गायी तृप्त व पुष्ठ झालेल्या असतात. नुकत्याच व्यायलेल्या गायींना या निसर्गोदत्त योग्य हवामान, भरपूर पाण्याची उपलब्धत असल्याने गायींची दूध उत्पादनक्षमता सुद्धा उच्चतम स्तरापर्यंत पोचलेली असते. गायींकडे आपण धन आणि देवांचा वास ह्या दृष्टीने बघतो. त्यामुळे तिचे पूजन धनत्रयोदशीच्या आधीच्या दिवशी करत असले पाहीजेत. पुराण कालापासून ज्याच्या पदरी चांगल्या वंशाचे गोधन जितके जास्त स्थावर त्यांची संपत्ती ठरत असे. म्हणुनच गोदान, सालुंकृत गोदान अशा गोदांना महत्व प्राप्त झाले. आपण हिंदू धर्मीय आपल्याला जो जो चतुष्पाद उपयोगी आहे. त्याच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एकदा त्याचे श्रद्धेय पुजन करतो. उदा. गायींसाठी वसुबारस, बैलांसाठी बैलपोळा, म्हशींसाठी दिवाळीपाडवा किंवा देवदिवाळी, घोड्यांसाठी दसरा इ. आता आपण वसुबारस प्रत्यक्ष कशी साजरी करायची ते बघूया
. ★ अश्विन कृष्ण द्वादशीच्या दिवशी दुपार नंतर प्रत्येक शेतकऱ्याने आणि गोपालकाने पुजेसाठी गायवासरू बांधता येईल एवढी जागा स्वच्छ सारवून किंवा धुवून घ्यावी. अशा जागेवर सुरेख रांगोळी काढावी, छोटासा मांडव तयार करून मांडव, तोरण आणि झेंडुच्या माळा तयार करून सजवावा. मांडवाला आंब्याच्या डहाळ्या बांधाव्या. कुरणांमधून गायी त्यादिवशी जरा लवकर घरी आणाव्यात. या पुजेसाठी शक्यतो एकाच रंगाचे गायवासरू असावे. ज्या गाय-वासराची पूजा करायची तीला गरमपाण्याने स्वच्छ धुवावे, शिंगांना आकर्षक रंग लावावा. तिच्या गळ्यात घुगराच्या माळा आणि फुलांचा हार घालावा. चारही पायांमध्ये फुलांचे सर बांधावेत, आकर्षक रंगाचे दावे बांधावे, तसेच वासराला त्याच्या वयानुसार सजवावे. गायवासरास पुर्वेकडे तोंड करून बांधावे. गोरज मुहूर्तावर घरातील ज्येष्ठ सवाष्णीने प्रथम पुजा करावी. पुजेच्या वेळी प्रथम गाय आणि वासराचे फक्त पुढील पायांवर दूध पाणी घालावे. हळद, कुंकू लावावे. अक्षता वाहणे, निरांजनाने औक्षण करावे. गायवासराभोवती प्रदक्षणा घालावी. गायीला उडीदवडा, करंजी,गुळाचा बडा, बाजरीची भाकरी, गवारीच्या शेंगा खाऊ घालाव्यात. श्रद्धापूर्वक नमस्कार करतांना पुढील भावना मनात निश्चित करावी कि हे गायी आज तुझ्यामुळे माझी उपजलेली मुले तुझ्या दुधावर उत्तम वाढलेली आहेत. ह्याचे श्रेय फक्त तुलाच जाते. आज माझी शेती आणि वाडा तुझ्यामुळेच बहरला आहे तरी असेच यापुढेही माझ्या कुटूंबाचे व समाजाचे रक्षण कर. नंतर घरातील सर्वानी पूजन करावे. घरातील कापुरूषाने ताम्रकलशामध्ये पाणी घेऊन डाव्या हाताने पाणी उजव्या हातावरून सोडून अर्घ्य द्यावे. अर्घ्य देतांना पुढील श्लोक म्हणावा -क्षिरो दार्णव संभुते सुरसूर नमस्कृते Iसर्वदेवमये मातृ गृहाण अर्घ्य नमोऽस्तुते IIअर्थ – क्षिरसागरातून जन्म झालेल्या देव आणि राक्षसांनी प्रणाम केलेल्या देवस्वरूप अशा कामधेनू माते मी देत असलेल्या (अर्ध्याचा) सत्काराचा तू स्विकार कर. तुला आमचे अनंत अनंत प्रणाम.
यानंतर सर्व कुटुंबाने एकत्र येऊन पुढील प्रार्थना म्हणावी.सर्व देव मये देवी सर्व देवैर अलंकृते Iमातूरांमय अभिलाषीत सफलं कुरू नंदिनी IIअर्थ – सर्वांना आनंद देणाऱ्या हे नंदीनी गोमाते सर्व देव तुझ्यासाठी निवास करकात म्हणून तू सर्व देवमयी आहेस. सर्व देवांनी तुझा गौरव केला आहे. तेव्हा हे आई तू आमच्या इच्छा पुर्ण कर. ★ गोमातेचे महत्व – सर्वसाधारणपणे एकाच मालकाकडे उत्तमपणे सांभाळली गेल्यास गायीचे आयुष्यमान २२ ते २५ वर्षापर्यंत सहज होते. या कालखंडात तीची १० ते १२ वेती सहज होतात, म्हणजेच एका गायीपासून इतका गोवंश सहजरीत्या आयुष्यभरात उपलब्ध होतो. यामध्येशेतीसाठी बैल व दूधासाठी आणि पुढील वंशनिर्मितीसाठी कालवडी मिळतात. एका गायीपासून संपूर्ण वर्षभरात २८०० ते २९०० लिटर गोमुत्र फवारणीसाठी उपलब्ध होते. यावरून मिळणाऱ्या खोंडाची किंमत, कालवडींची किंमत, प्रतीवर्षीच्या शेणखताची किंमत, किटकनाशक फवारणीसाठीच्या गोमुत्राची किंमत, मिळणारे दूध ह्या सर्वांचा विचार केल्यास शेतीव्यवस्थेमध्ये गायीला अनन्यसाधारण महत्व आहे. याची खात्री पटते.
★ पाश्चिमात्य देशांच्या संस्कृतीचे अलीकडे आलेले आक्रमण परतवून लावण्यासाठी भारतीय शेतीला पुन्हा गतवैभव प्राप्त करण्यासाठी पुज्य जगद्गुरू शंकराचार्य आणि काही मान्यवरांनी त्यांचे मार्गदर्शनाखाली संपूर्ण भारतभर विश्वमंगल गोग्राम यात्रा अशी चळवळ उभारली होती. या यात्रेचा मुख्य उद्देश होता प्रत्येक शेतकऱ्याने गाय सांभाळलीच पाहिजे. आदर्श देशी गोवंश वाढवला पाहिजे. बैलावर आधारीत शेती कामे वाढली पाहिजे. गोमय आणि गोमुत्राचा वापर जास्तीत जास्त करून नापीक जमीन सुपीक केली पाहिजे. गो-कथा व गायीबद्दलची माहिती सर्वापर्यंत पोहोचावी हीच अपेक्षा…
*★ गाय व वासराच्या अंगी असणारी वात्सल्यता, उदारता, प्रसन्नता, समृध्दी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. वसु बारसच्या हार्दिक शुभेच्छा…*
*✍🏻 प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे व समस्त अहिरे परिवार, दाभाडी ता. मालेगाव (नाशिक)*
