
नाशिकरोड:-( प्रतिनिधी )सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ बहि:शाल शिक्षण मंडळ आणि शिखरेवाडीतील स्वानंद ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या बहि:शाल शिक्षण केंद्राच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय कार्यशाळा संस्थाध्यक्ष जयराम कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली विविध व्याख्यानांनी संपन्न झाली. सकाळी संपन्न झालेल्या प्रथम सत्रात चतुरस्त्र साहित्यिक प्रा.डॉ.गिरीश पाटील यांनी ‘आनंदाचा पासवर्ड’ या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.

सुखात अडकू नका आणि दुःखात भटकू नका. आनंदी राहण्याची सवय लावून घेताना, आनंद हा स्वभावात मुरला पाहिजे. भूतकाळ विसरा आणि कटू आठवणी डिलीट करा. भविष्यकाळाचा अतिविचार न करता वर्तमानकाळात पूर्णपणे आनंद घेत जगा, असे सांगितले.

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना बिटको महाविद्यालयातील प्रा.डॉ.उत्तम करमाळकर. समवेत डावीकडून सुनंदा गोसावी, जयराम कुलकर्णी
दुसरे पुष्प बिटको महाविद्यालयातील प्रा.डाॅ.उत्तम करमाळकर यांनी ‘पुस्तकं बोलतात माणसांशी’ या विषयावर विचार व्यक्त केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी पुस्तकं आपल्याला घडवणारा एक जादू ई दरवाजा आहे. पुस्तकं अंत:करणात खळबळ माजवणाऱ्या मनाला शांत करून आनंद देतात. ज्ञानाची गंगा असणारी पुस्तकं आपल्याला आधार देतात. पुस्तकंसंस्कृती समजून घेतल्याशिवाय समाजाचे आकलन होत नाही, असे उदबोधक विचार मांडले. भोजनोत्तर

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले. समवेत डावीकडून अविनाश गोसावी, सुनंदा गोसावी, जयराम कुलकर्णी, रवींद्र मालुंजकर
दुसऱ्या सत्रातील तिसरे पुष्प ज्येष्ठ साहित्यिक विवेक उगलमुगले यांनी ‘आदर्श जीवनाची गुरुकिल्ली’ या विषयावर गुंफताना आदर्श जीवन जगण्यासाठी मनाचा निग्रह आवश्यक आहे. ज्या गोष्टी स्वत:चे शरीर, मन आणि समाजासाठी उपकारक असतात, त्यात सातत्य ठेवल्यास आपण इप्सित ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो. आदर्श हे जसे घरात आणि समाजात असतात; तसेच ते ग्रंथांतूनही मिळतात. जो आदर्शवत जीवन जगतो; त्याचे आयुष्य सुखी, समृद्ध आणि निरामय असते. आपल्या आयुष्यात आदर्श जपणे, आदर्श जीवनमूल्ये जोपासणे अत्यंत गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

स्वानंद ज्येष्ठ नागरिक संघाच्या एकदिवसीय कार्यशाळेत बोलताना कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर. समवेत डावीकडून अविनाश गोसावी, सुनंदा गोसावी, जयराम कुलकर्णी.
चौथे पुष्प कवी आणि सूत्रसंचालक रवींद्र मालुंजकर यांनी ‘सूत्रसंचालनाची गुरुकिल्ली’ या विषयावर बोलताना सूत्रसंचालकाने नेहमी वाचन करत जावे. इतर व्यक्ती किंवा सूत्रसंचालक आपल्या सूत्रसंचालनात कोणकोणत्या विचारांचा वापर करतात, कसे बोलतात, यांचे अवलोकन करावे. उत्तमोत्तम अनमोल विचारांचे टिपण काढावे. वाचन, मनन आणि चिंतनाने कार्यक्रमाचा दर्जा आणि गुणवत्ता उंचावते. सूत्रसंचालन करताना मोजके आणि आवश्यक तेच बोलावे. काय बोलावे आणि किती बोलावे; हे ज्याला समजते तोच उत्तम सूत्रसंचालक! प्रभावी सूत्रसंचालक हाच यशस्वी कार्यक्रमाचा कणा असतो, असेही ते म्हणाले. संस्थेच्या सभासदांची लक्षणीय उपस्थिती असलेल्या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष जयराम कुलकर्णी आणि उपाध्यक्षा सुनंदा गोसावी यांनी भाषणात सर्व वक्त्यांच्या विचारांचा गौरव केला. कार्यशाळा यशस्वीतेसाठी सचिव आणि केंद्रकार्यवाह अविनाश गोसावी, उपसचिव श्रीकांत मोहरील, उपखजिनदार शरद वैद्य, परमेश्वर चिंतकिंदी, सुधाकर सोनवणे, प्रदीप भालेराव, दिलीप भिंगारकर, दीपाली भिंगारकर, शंखपाळ यांनी विशेष परिश्रम घेतले. सरस्वती पूजन आणि मेखला रास्वळकर, मंगल मोहरील यांच्या सरस्वती स्तवनाने कार्यशाळेची सुरुवात झाली. वैजयंती चंद्रात्रे, वैजयंती डांगे, अनिल सहस्रबुद्धे आणि मृणाल प्रभुणे यांनी निवेदन करत पाहुण्यांचा परिचयही करून दिला.
