
ईगतपुरी (तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर ) आगामी जिल्हा परिषद निवडणुकांसाठी बहु प्रतिक्षित ईगतपुरी तालुक्यातील पाचही जि.प.गटाचे आरक्षण जाहिर झाले आहे. यात पाच पैकी चार जि.प.गटाचे आरक्षण हे अनुसुचित जमातीसाठी जाहिर झाले आहे.तर एकमेव घोटी जि.प.गट सर्वसाधारण साठी सुटल्याने तालुक्यातील प्रस्थापित नेते रिंगणाबाहेर झाले आहेत. अनेक नेत्याच्यां इच्छा व महत्त्वाकांक्षावर पाणी फिरले असुन किंग बनण्याच्या प्रतिक्षेत असणार्यानां पुन्हा किंगमेकरच्या भुमिकेत जावे लागले आहे. माजी जि.प.सदस्य गोरख बोडके, अँड. संदिप गुळवे आदी माजी जि.प.सदस्यासह विविध पक्षातील अनेक प्रस्थापित नेते आरक्षणाकडे विशेष लक्ष देऊन होते.मात्र घोटी जि.प.गटाचा अपवाद वगळता सगळेच अनुसुचित जमातीसाठी गट राखीव झाल्याने पुढील पाच वर्ष पुन्हा प्रतिक्षेत काढावी लागणार आहे. विदयमान जि.प.सदस्य सौ. सुशिला मेंगाळ, हरिदास लोहकरे, कावजी ठाकरे , नयना गावित व उदय पा. जाधव या पाचही जि.प.सदस्याचें गट सुरक्षित राहिले आहेत. पैकी वाडिवर्हे जि.प.गटात माजी आमदार सौ.निर्मला गावित यांच्या कन्या तथा जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा नयना गावित यावेळी या गटातुन निवडणुकीत उतरणार की नाही याबाबत साशंकता आहे. तर शिरसाटे (खंबाळे) जि.प.गटातुन माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांच्या सुविदय पत्नी सौ.सुशिला मेंगाळ यांना पुन्हा संधी असली तरी ते पुन्हा या गटात नशिब आजमावणार की वाडिवर्हे जि.प.गटातुन रिंगणात उतरणार अशी चर्चा आहे. हरिदास लोहकरे व कावजी ठाकरे हे दोन्ही विदयमान जि.प. सदस्य उबाठा शिवसेना गटात आहे.त्यांची उमेदवारी पुन्हा कायम राहते की नाही ? याबाबत औत्सुक्य असेल. मनसे व उबाठाच्या संभाव्य युतीमुळे समिकरणे बदलणार आहे.मनसे महाविकास आघाडीचा चौथा भिडु होणार का ? कि उबाठा म.वि.आ तुन बाहेर पडणार ? असे झाले तर मग तिरंगी लढती होतील. महायुतीतही सगळेच आलबेल असेल असे नाही.जागा वाटपात भाजप घोटी व टाकेद गटावर दावा करु शकतो. सर्वाधीक लक्यवेधी लढत घोटी जि.प.गटात पहावयास मिळेल. या गटातुन अनेक मातब्बर नशिब आजमावण्याची शक्यता आहे.यात विदयमान जि.प.सदस्य उदय पा. जाधव, उबाठाचे निवृत्ती जाधव, मनसेचे संदिप किर्वे अशी अनेक नावे चर्चेत आहे.
