
नाशिक:( प्रतिनिधी)- आपल्या अभिनयातून विविध भूमिका साकार करून स्वतःचं अस्तित्व सिद्ध करणाऱ्या नाशिककर अभिनेत्री कौतुकास पात्र आहेत. त्यांच्या कार्याची ओळख करून देणाऱ्या गिरजा दिवाळी अंकाच्या माध्यमातून अशा स्रीशक्तीचा जागर म्हणजे सुंदर आणि उत्कट भावनांचा संगम सुरेख आहे, असे गौरवोदगार ज्येष्ठ साहित्यिका प्रा.सुमती पवार यांनी काढले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या २७व्या गिरजा दिवाळी अंकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी प.सा.नाट्यगृहात आयोजित विशेष सोहळ्यात त्या बोलत होत्या. प्रा.सुमती पवार यांच्यासह कार्यक्रमाध्यक्षा क.का.वाघ शिक्षण संस्थेच्या विश्वस्त शकुंतला वाघ, समाजसेविका दीपाली गीते, चित्रपट अभिनेत्री सुरेखा शर्मा, रेवती अय्यर, रूपाली पवार, दीपाली चांदवडे, गीतांजली घोरपडे, पल्लवी पटवर्धन, हर्षाली भोसले, सविता चतुर, गझलकार जयश्री वाघ, साहित्यिका अलका दराडे, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांच्या हस्ते गिरजा दिवाळी अंकाचे प्रकाशन करण्यात आले. आज समाजातले संस्कार हरवत चालले असून समाजव्यवस्था टिकविण्यासाठी संस्काराबरोबरच संघटन महत्त्वाचे असल्याचे अभिनेत्री सुरेखा शर्मा यांनी सांगितले. तर महिला कोणत्याही क्षेत्रात मागे नसून आधुनिक भारतात महिलांचे योगदान मोठे आहे. चौकटीबाहेर जाऊन महिला प्रगती असल्याने अभिमान वाटतो, असे मत दीपाली गिते यांनी मांडले. कार्यक्रमाध्यक्षा शकुंतला वाघ, रवींद्र मालुंजकर, जयश्री वाघ यांनीही विचार व्यक्त केले. भाग्यश्री चौधरी यांनी प्रास्ताविक केले तर आशा गोवधने यांनी सूत्रसंचालन केले. भारती निकम यांनी आभार मानले.
