
नांदगाव (प्रतिनिधी) — महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या परिपत्रकानुसार उद्योगसरेखित व नवयुगीन अल्पकालीन व्यवसाय अभ्यासक्रमांचा शुभारंभ शहीद भगतसिंग शासकीय आयटीआय, नांदगाव येथे करण्यात आला.या कार्यक्रमाचे उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते, तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून ऑनलाइन पद्धतीने पार पडले.या उपक्रमाचा उद्देश अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे, युवकांच्या रोजगारक्षमतेत वाढ करणे, तसेच राज्यात कौशल्य विकासाला चालना देणे हा आहे. राज्यातील 400 शासकीय आयटीआय व 130 शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये एकूण 2502 तुकड्यांचे प्रशिक्षण सुरू होत आहे.चालू शैक्षणिक वर्षात 75 हजार युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट असून, पुढील वर्षी ही संख्या एक लाखांपर्यंत वाढविण्याचे नियोजन आहे. विशेषतः महिला उमेदवारांसाठी 364 विशेष तुकड्या तर उद्योजक क्षेत्रासाठी 408 विशेष तुकड्या सुरू करण्यात आल्या आहेत.या प्रसंगी व्यासपीठावर नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, महेश पेवाल, नंदू पाटील, नांदगाव तहसीलचे निवासी नायब तहसीलदार देवेंद्र कुऱ्हे, म.वि.प्र.आय.चे प्राचार्य कैलास जाधव, सोमनाथ ठाकरे, दत्तात्रय क्षीरसागर, संस्थेचे गटनिधीक्षक एम.डी. निकुंभ, तसेच कार्यालयीन अधीक्षक दीपक गावले आणि इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ए. आर. मढवी यांनी केले, तर प्रास्ताविक पी. एस. गायकवाड यांनी सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली.
