
छत्रपती शिवरायांना अनोखी मानवंदना देण्याचा संकल्प – मा. विजय जोशी
बिभीषण कांबळे
तालुका प्रतिनिधी अर्धापूर
महाराष्ट्र शासनाच्या ‘अमृत’ (महाराष्ट्र संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण प्रबोधिनी) या संस्थेच्या वतीने यंदाच्या दीपावलीमध्ये “दुर्गोत्सव २०२५” या भव्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील नागरिकांनी १२ प्रसिद्ध दुर्गांपैकी एका दुर्गाची प्रतिकृती साकारून, छत्रपती शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना द्यावी, असे आवाहन अमृतचे व्यवस्थापकीय संचालक मा. विजय जोशी यांनी केले आहे.
शिवरायांच्या पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या दुर्गांचे जतन आणि जागर करणाऱ्या या उपक्रमात भाग घेण्यासाठी सर्वांनी पुढे यावे, असे आवाहन पुण्यातील ‘शिवश्रुष्टी’ हिस्टोरिकल थीम पार्क येथे झालेल्या अनावरण सोहळ्यात करण्यात आले. यावेळी अमृतचे विशेष कार्यकारी अधिकारी श्रीराम बेंडे, प्रवीण पांडे, सिद्धेश्वर वरणगावकर तसेच राज्य व्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते.दुर्गोत्सवात सहभाग कसा घ्यावा?
रायगड, राजगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, साल्हेरदुर्ग, खांदेरीचा दुर्ग, जिंजी, पन्हाळगड, शिवनेरी, विजयदुर्ग, लोहगड आणि पद्मदुर्ग (सुवर्णदुर्ग) या १२ दुर्गांपैकी कोणताही एक गडदुर्ग प्रतिकृती स्वरूपात साकारावी.
दुर्गाची उंची किमान दोन फूट असावी. आकार अधिक असू शकतो.त्या प्रतिकृतीसोबत सेल्फी काढूनhttp://www.durgotsav.com या संकेतस्थळावर अपलोड करावी.
सेल्फीत दुर्गाचा जास्तीत जास्त भाग स्पष्टपणे दिसावा, याची दक्षता घ्यावी.सहभागी प्रत्येकासाठी मुख्यमंत्री स्वाक्षरीचे अभिनंदन पत्र या उपक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस मा. मुख्यमंत्री यांच्या स्वाक्षरीने “अभिनंदन पत्र” दिले जाणार आहे.तसेच, अमृत विद्या या डिजिटल लर्निंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध शिवरायांच्या इतिहासावर आधारित ९९९/- रुपये किमतीचे प्रशिक्षण निशुल्क मिळणार आहे.या प्रशिक्षणात:
स्वराज्यरक्षक दुर्गांची ओळख
शिवचरित्रातील महत्त्वाच्या घटना
कवी भूषण यांच्या रचना
स्वराज्यासाठी लढलेले शूर योद्धे
यांचा समावेश आहे.
युनेस्को जागतिक वारसात महाराष्ट्रातील १२ दुर्गांचा समावेश महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नांनी या १२ दुर्गांचा युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाल्याचे यश मिळाले असून, याचा अभिमान प्रत्येक मराठी माणसाने बाळगावा, असे आवाहन या कार्यक्रमात करण्यात आले.
विजय जोशी यांचे आवाहन
“दुर्गोत्सव हा केवळ एक उपक्रम नाही, तर आपल्या पराक्रमी इतिहासाचा सन्मान आहे. आबालवृद्धांनी यात सहभागी होऊन शिवरायांना प्रतिकृतीमधून मानवंदना द्यावी,” असे आवाहन अमृतचे संचालक मा. विजय जोशी यांनी केले.
