
नाशिक. (प्रतिनिधी ) :-भारतीय संविधान हे प्रत्येकाला न्याय्य हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून देते. स्वातंत्र्यपूर्व काळात संविधानातील समानतेच्या तत्त्वांचं बिजारोपण करणारे छत्रपती शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोकराज्य होते, असे प्रतिपादन शिवविचार आणि भारतीय संविधानाचे व्यासंगी अभ्यासक प्रा.सुनील आगळे यांनी केले. मातोश्री तंत्रनिकेतनच्या वतीने ‘भारतीय संविधान आणि इतिहास’ या विषयावर आयोजित संवाद कार्यशाळेत मुख्य संवादक म्हणून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. प्रा.आगळे पुढे म्हणाले की, जगातील संविधानिक लोकशाहीचा उगम ब्रिटनमध्ये झाला. त्यापूर्वीही ग्रीक गणराज्य आणि भारतातील काही गणराज्ये यांच्यात लोकशाही मानली जायची. छत्रपती शिवरायांचे लोकराज्य मानवता धर्माचा आदर्श वस्तुपाठ होते, असे सांगून तत्कालीन हिंदुस्थान आणि आजचा भारत देश युरोपीय सत्तांच्या ताब्यात कसा गेला, याबाबत अनेक बारकावे त्यांनी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना सांगत स्वातंत्र्यप्राप्तीसाठी चळवळी दरम्यान स्वातंत्र्यासह संविधानाचीही मागणी जोर धरू लागली. तेव्हापासून आपल्या देशात लोकशाहीची बीजे कशी रोवली गेली आणि त्यातून आपल्या लोकशाही राष्ट्रासाठी सर्वात महत्त्वपूर्ण असे ‘भारतीय संविधान’ कसे निर्माण झाले; याबाबत प्रा.सुनील आगळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सर्व विभागांतील द्वितीय वर्षाचे विद्यार्थी उपस्थित होते. मातोश्री तंत्रनिकेतनचे प्राचार्य आनंद रेलकर, यांत्रिकी विभागप्रमुख प्रा.योगेश जाधव, प्रा.मनीषा भाबड आणि सर्व प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.प्रदीप गायधनी यांनी सूत्रसंचालन केले.
