
लासलगाव (प्रतिनिधी) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तर च्या वतीने संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनानुसार राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. ‘राष्ट्रीय सेवा योजना सप्ताह’च्या पार्श्वभूमीवर पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. रस्ते अपघातानंतर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करावी व माणुसकी जपावी असा संदेश देत विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसर, शहरातील ग्रामपंचायत आणि बसस्थानक आदी ठिकाणी प्रभावी पथनाट्य सादर करून नागरिकांचे लक्ष वेधले.

या पथनाट्य सादरीकरण प्रसंगी विद्यार्थी व नागरिकांचा उत्तम प्रतिसाद लाभल्याचे चित्र पहायला मिळाले. या पथनाट्याच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा, रस्ता अपघातानंतर नागरिकांनी करावयाची मदत, सोशल मीडियाचा वापर रील्स, व्हिडिओ बनविण्यासाठी न करता 108 किंवा 112 या नंबर वर कॉल करून अपघातग्रस्तांना मदत करण्यासाठी करावा, माणुसकी जपूया अशा आशयास अनुसरुन पथनाट्यातून जनजागृती करण्यात आली. पथनाट्य सादरीकरण प्रसंगी उपस्थित लासलगाव बस आगार व्यवस्थापक श्रीमती सविता काळे, लासलगाव ग्रामपंचायत सरपंच सौ.योगिता पाटील, श्री.योगेश पाटील, ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत व बस स्थानक येथील कर्मचारी व प्रवासी यांनी विद्यार्थ्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत सातत्याने असे उपक्रम व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.

पथनाट्य पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या पथनाट्याच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, प्रा.अश्विनी पवार, प्रा.महेश होळकर, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले.
