
नाशिक:- ( प्रतिनिधी ) आजही अनेक समाजघटक दोन वेळच्या भोजनापासून कोसो मैल दूर आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी अशा वंचित घटकांना आपण मदतीचा हात द्यावा, असे आवाहन साखर उद्योगातील ज्येष्ठ तंत्रज्ञ आणि कवी वाळू आहेर यांनी केले. आडगाव शिवारातील इच्छामणी नगर मित्रमंडळाच्या वतीने वाळू रघुनाथ आहेर यांचा डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया, पुणे यांचेकडून जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी खासदार कै.उत्तमराव ढिकले सभागृहात त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अर्जुन सूर्यवंशी होते. नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सेवानिवृत्त कार्यकारी संचालक आणि जि.प.सदस्य बाळासाहेब शिरसाठ यांना समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. श्री.शिरसाठ यांनीही मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष कैलास आहेर यांनी प्रास्ताविक केले आणि सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला. संस्थेचे सर्व सभासद कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.
