
नाशिक: (प्रतिनिधी ) – अध्यात्म आणि साहित्य यांचा अनोखा संगम असलेले महाभारत हे खरोखरच अति प्राचीन वाङ्मय आहे. त्यातील प्रत्येक प्रसंग आपल्याला अनोखी शिकवण देतात. म्हणूनच महाभारत आजही समाजाला दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन वैद्य भूपाल देशमुख यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमात वैद्य भूपाल देशमुख ‘महाभारतातील माणसं’ या पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते.
वैद्य देशमुख पुढे म्हणाले की, कृष्णासह महर्षी व्यास, द्रोणाचार्य, कुंती, अर्जुन, द्रौपदी, शकुनी, दुर्योधन, कर्ण या महाभारतातील विविध व्यक्तिरेखा या पुस्तकात अधोरेखित केलेल्या आहेत. कर्णाचं चारित्र्य आणि खरं रूप यात मांडले आहे. कृष्णाचं अनुकरण करणे एवढे सोपे नाही. महाभारतातील प्रसंग, व्यक्तिमत्त्वं आणि स्वभावविशेष या पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला. महाभारत पूर्णपणे समजून घेण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ कवयित्री सुशीला संकलेचा आणि अलका दराडे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर वैजयंती सिन्नरकर यांनी आभार मानले. दरम्यान येत्या मंगळवारी (१४) रोजी नवनाथ गायकर हे ‘आघाडी’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
