
सिन्नर ( प्रतिनिधी) यशवंतराव चव्हाण साहित्यिक,सुसंस्कृत व आदर्श राजकारणी होते.त्यांचे कार्य समाजासाठी अनुकरणीय तसेच प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि:शाल शिक्षण मंडळाचे ग्रंथ अन्वेषक डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले.शताब्दी इंग्लिश मिडीयम स्कूल आगासखिंड, ता.सिन्नर तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बहि:शाल शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ज्ञान विज्ञान वाचन चळवळ ,व्याख्यानमालेत “कृष्णाकाठ…यशवंतराव चव्हाण ” या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर प्राचार्य जितेंद्र भारती,केंद्र कार्यवाह आनंदा महाजन,प्रशांत सुरवाडे उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली.यावेळी बोलताना व्याख्याते डॉ.झळके यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या जीवनातील अनेक प्रसंग व त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील देशासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला.त्यांनी महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री ,भारताचे उपपंतप्रधान,संरक्षण,अर्थ मंत्री म्हणून काम केले.यशवंतराव चव्हाण हे उत्तम वक्ते, संसदपटू , चारित्र्य संपन्न,अभ्यासू,दिलदार व राष्ट्रसेवेसाठी समर्पित व्यक्तिमत्व होते. कृष्णाकाठ हे त्यांचे आत्मचरित्र खूप गाजले.त्यात त्यांनी आपले बालपण,शिक्षण,राजकारण,सामाजिक कार्य आणि केलेला राजकीय संघर्ष,तसेच विविध विषयांवर भाष्य केले.यावेळी संस्थाचालक ललिता वीर, दत्तात्रय वीर, प्रशांत वीर,पूनम वीर आदी उपस्थित होते.यावेळी केन्द्र कार्यवाह आनंदा महाजन यांनी वक्त्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन कल्पना पाळदे ,सोनाली माळवे यांनी केले तर आभार अर्चना आडके यांनी मांडले.
