
नाशिक:- (प्रतिनिधी ) जुन्या काळापासून मनोरंजनाबरोबरच समाजमनाचे प्रबोधन करणाऱ्या तमाशा कलेला सध्या उतरती कळा लागलेली आहे. मात्र आजच्या काळातही जनजागृतीसाठी तमाशा कलेची सर्वार्थाने जोपासना आवश्यक आहे, असे आग्रही प्रतिपादन ख्यातनाम शाहीर प्रसाद अंतरवेलीकर यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘तमाशाचा तमाशा’ या पुस्तकावर १९०वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अर्जुन वेलजाळी होते. शाहीर अंतरवेलीकर पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तमाशा कलावंत आणि शाहीर यांच्या अनेक पिढ्या निर्माण झाल्या. या कलावंतांच्या चळवळीतून विचार आणि सत्यशोधकी जलसेही निर्माण झाले. नंतरच्या काळात या क्षेत्रातही काही अवगुण घुसल्यामुळे तमाशाकला बदनाम झाली आहे. यासाठी तमाशा कलावंतांनी प्रबोधनाचा वसा प्रामाणिकपणे जपला पाहिजे. वैज्ञानिक प्रगती, नाटक आणि चित्रपट या क्षेत्रांत अधिक प्रगती झाल्यामुळे तमाशावर त्यांचा परिणाम झाला. तरीही तमाशाची आवड ग्रामीण भागात आजही तेवढीच टिकून आहे, असेही ते म्हणाले. सुमती टापसे आणि अलका आगळे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. मधुकर गिरी यांनी सूत्रसंचालन तर सुरेश पवार यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१०) रोजी वैद्य भूपाल देशमुख हे ‘महाभारतातील माणसं’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
