
सोनांबे (ता. सिन्नर) — आपल्या कार्याने समाजात प्रेरणादायी ठसा उमटवणारे सोनांबेचे भूमी पुत्र व सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक पांडुरंग विठ्ठल पवार यांच्या ‘विडीची माडी’ या आत्मकथनात्मक पुस्तकाला नेवासा येथील श्री संत किसन महाराज सुडके विकास प्रतिष्ठानचा पहिला ‘श्री संत किसन महाराज सुडके जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर झाला असून, त्यांचा गौरव सोहळा दिमाखात पार पडणार आहे.पांडुरंग पवार हे वाणिज्य शाखेचे पदव्युत्तर पदवीधर व MBA पदवीधारक असून, त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात भारतीय सैन्य दलात केली.

गोवा, मेघालय, जम्मू–काश्मीर या दुर्गम भागात सात वर्षे देशसेवा बजावत त्यांनी पराक्रमाची छाप सोडली. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस विभागात तब्बल ३० वर्षे सेवा देत गडचिरोली, बीड, अहमदनगर, मुंबई, नाशिक, जालना, जळगाव आदी ठिकाणी कार्यरत राहून कायदा व सुव्यवस्थेची पताका उंचावली.सेवानिवृत्तीनंतरही समाजाभिमुख कार्याची ओढ त्यांनी सोडली नाही. सिन्नर येथील ‘पर्सनल करिअर अकॅडमी’ या संस्थेचे ते संस्थापक असून, सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षणाच्या माध्यमातून १८,५०० हून अधिक युवकांना सैन्य, पोलीस व विविध शासकीय खात्यांमध्ये रुजू होण्यासाठी मार्गदर्शन केले आहे — हे त्यांच्या दूरदृष्टीचे व राष्ट्रसेवेप्रती असलेल्या बांधिलकीचे द्योतक आहे.याचबरोबर, ते कोनांबे (ता. सिन्नर) येथे ‘श्री साईनारायण गुरुकुल ॲण्ड ज्युनिअर कॉलेज’ ही निवासी शिक्षणसंस्था चालवतात. शैक्षणिक कार्याबरोबर साहित्यसाधनेत रमलेले पवार यांनी लेखनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे ध्येय उराशी बाळगले आहे. त्यांच्या “विडीची माडी” या आत्मकथनातून जीवनातील संघर्ष, शिस्त आणि सेवाभावाचा प्रवास वाचकांसमोर येतो. तसेच त्यांच्या ‘आकसलेला आत्मा’ या गीतसंग्रहात ४७५ गीते— बालगीते, भक्तिगीते, युगलगीते आणि सामाजिक संदेश देणारी प्रबोधनपर गीते यांचा समावेश आहे.मानवतेचा सुगंध पसरवणाऱ्या अशा या थोर व्यक्तिमत्वाला मिळणारा ‘श्री संत किसन महाराज सुडके जीवन गौरव पुरस्कार’ हा नक्कीच सोनांबे तसेच सिन्नर तालुक्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
