
सिन्नर (प्रतिनिधी) – सिन्नर तालुक्यातील सर्व आदिवासी समाज बांधवांच्या वतीने “आदिवासी आरक्षण बचाव आक्रोश मोर्चा” मोठ्या उत्साहात व शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आला. हुतात्मा स्मारक आडवा फाटा येथून निघालेला मोर्च महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती शिवाजी महाराज, भगवान एकलव्य, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आद्य क्रांतिवीर राघोजी भांगरे, आद्य क्रांतिकारक उमाजी राजे नाईक, क्रांतिवीर भागोजी नाईक यांना पुष्पहार अर्पण करून सिन्नर तहसील कार्यालयावर पोहोचला तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले शासनाच्या वतीने मोर्च्याद्वारे संकलित निवेदन सिन्नरचे तहसीलदार देशमुख यांनी स्विकारुन राज्य सरकारकडे पाठवण्यात आले. *शिवाजीराव ढवळे यांचे वक्तव्य*> “देश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालतो.

संविधानाने अनुसूचित जमातींना दिलेले हक्क कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. महाराष्ट्रात सध्या राजकीय स्वार्थासाठी आदिवासी आरक्षणात इतर जातींना समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, जे संविधानविरोधी आहेत.आदिवासी समाज शांत आहे, पण तो कधीही अशक्त नाही. जर आमच्या हक्कांवर गदा आली, तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून लढाई लढू — ती लढाई तीव्र आणि निर्णायक असेल. आमचे हक्क आमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही.” लकी जाधव यांनी सरकारवर साधला निशाना “सध्याचं सरकार हे गाजराची शेती करणारं सरकार आहे. ते सर्वांना फक्त गाजर दाखवत आहेत, पण प्रत्यक्षात काहीच मिळत नाही.

आदिवासी समाज शतकानुशतके अन्याय सहन करत आला, पण आता जागा झाला आहे. आम्हाला फसवणूक नको, आमचे हक्क हवे आहेत. आदिवासी समाजाला कोणीही हलक्यात घेऊ नको! आम्ही शांततेचा मार्ग सोडणार नाही, पण आमचं अस्तित्व आणि हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढायला सदैव तयार आहोत.” श सामाजिक कार्यकर्ते देवराम खेताडे यांनी “धनगर व बंजारा समाज इतर राज्यातील उदाहरण देऊन महाराष्ट्रात आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागत आहेत. जर असं झालं, तर त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील मराठा समाजालाही आदिवासी समाजात आरक्षण देऊन टाका आणि महाराष्ट्र राज्यालाच आदिवासी राज्य म्हणून घोषित करा.सर्वांचे प्रश्न मिळतील आणि आदिवासी राज्य झाल्याबद्दल आम्हाला देखील अभिमान वाटेल.” असे मत मांडले तसेच सोशल मिडियावर धनगर,बंजारा, आदिवासी समाजाच्या तरुण तरुणींनी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकून सामाजिक वातावरण खराब करण्याचं काम करु नये असेही आवाहन केले. यावेळी अलकाताई पवार, मंगेश औताडे, लक्ष्मण तळपे, विजय मुठे आदींनी आदिवासी समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी एकजुटीने लढा देण्याचे आवाहन केले.*तसेच यावेळी माजी नगरसेवक अशोक मोरे, माजी नगराध्यक्ष किरण डगळे, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले,माजी नगरसेवक रुपेश मुठे, तालुक्यातील आदिवासी समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समाजबंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. मोर्चा यशस्वी करण्यासाठी विजय बर्डे, किरण मोरे ,रामु इदे , विजय मुठे,निवृत्ती भांगरे,गंगारामभाऊ तळपाडे,राजेंद्र बेंडकुळे, विठ्ठल खोकले, भरत भांगरे, अमोल गवारी, ज्ञानेश्वर माळी, शिवाजी खेताडे, राज शिंदे, कचरू मेंगाळ, अजय कडाळे, शरद लहांगे, शिवाजी पिंपळे,रघू पवार,अनिल माळी,भरत मोरे यांनी परिश्रम घेतले. त्यांच्या नियोजनबद्ध कामामुळे मोर्चा शांततेत आणि शिस्तीत पार पडला.

मोर्च्याच्या प्रमुख मागण्या
1️⃣ अनुसूचित जमातींच्या आरक्षणात बंजारा, धनगर, हाटकर, बडगा, कैकाडी, यहार व इतर कोणत्याही जातींचा समावेश होऊ नये.
2️⃣ २५ फेब्रुवारी २०२२ च्या छोटा संवर्ग बिंदूनामावलीतील दुरुस्ती मागे घेऊन आदिवासी बिंदू क्रमांक २ पुन्हा लागू करण्यात यावा.
3️⃣ ६ जुलै २०१७ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार वैधता प्रमाणपत्र धारक उमेदवारांना नियुक्ती द्यावी.
4️⃣ मराठवाड्यातील १ जुलै २०१६ च्या (SIT) अहवालाची अंमलबजावणी करण्यात यावी.
5️⃣ अधिसंख्य झालेले १२,५२० पदे जातवैधता धारक उमेदवारांमधून तातडीने भरावीत.
6️⃣ ८५,००० सरळसेवा भरती जातवैधता प्रमाणपत्राशिवाय करण्यात येऊ नये.
7️⃣ “सशर्त जात वैधता प्रमाणपत्र” देण्याची प्रथा बंद करण्यात यावी.
8️⃣ जात प्रमाणपत्रासाठी १९५० पूर्वीचा पुरावा बंधनकारक करण्यात यावा.
9️⃣ २००६ च्या वनहक्क कायद्यानुसार आदिवासी लाभार्थ्यांना वनपट्टे वाटप करावे व गायरान जमिनीवरील घरांना संरक्षण द्यावे.
🔟 आदिवासी विभागाचा निधी इतर विभागाला वर्ग करू नये; आधी वर्ग केलेला निधी परत आदिवासी विभागाला द्यावा.
1️⃣1️⃣ आदिवासी समाजाची जमीन बिगर आदिवासींना भाडे तत्वावर देण्याचा कायदा करू नये व लुबाडलेल्या जमिनी आदिवासी मूळ मालकांना परत द्याव्यात.
