
सिन्नर (.वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी:) सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील शांत, निसर्गरम्य पांढुर्ली गावात आज दुपारी भीतीची लाट उसळली ! शेतात कामासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर अचानक बिबट्याने हल्ला चढवल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक शेतकरी व प्रत्यक्षदर्शी यांचेकडून मिळालेल्या माहितीनुसार, खंडू पवार हे शेतकरी आज (रविवारी) दुपारच्या सुमारास शेतात इलेक्ट्रिक मोटर सुरू करण्यासाठी गेले असता, झुडपांत दबा धरून बसलेल्या बिबट्याने झेप घेत त्यांच्या अंगावर हल्ला केला. या झपाट्याच्या हल्ल्यात पवार गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने पांढुर्ली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नाशिक येथे हलविण्यात आले आहे.घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, लोक घरी लवकर परतू लागले आहेत. विशेष म्हणजे काल रात्रीच शिवडे येथील अमोल चव्हाणके यांच्या घरासमोर टोमॅटोच्या शेतात देखील बिबट्याचे दर्शन घडले होते. त्यामुळे बिबट्याची हालचाल या संपूर्ण भागात वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून, “रात्रीच्या वेळी एकट्याने शेतात जाणे टाळा, तसेच टॉर्च व प्रकाशयंत्रांचा वापर करा” असा इशारा व खबरदारीचा सल्ला देण्यात आला आहे.ग्रामीण भागात सलग दिसत असलेल्या बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे — “आमच्या शेतीत काम करणेही आता धोक्याचे झाले आहे,” असे स्थानिक शेतकरी सांगत आहेत.प्रशासन व वनविभागाने तातडीने उपाययोजना करून बिबट्याला पकडण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
