
सिन्नर (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी ): शिक्षक नेते अंबादास वाजे यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त विविध शाळांमध्ये शालेय साहित्य वितरण कार्यक्रम झाले. डुबेरे, डुबेरेवाडी, सिन्नर येथील शाळांमध्ये कार्यक्रम झाले. डुबेरे ता. सिन्नर या कै.अंबादास वाजे यांच्या जन्मगावी झालेल्या कार्यक्रमात खासदार राजाभाऊ वाजे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे अध्यक्ष नारायणशेठ वाजे होते. यावेळी डुबेरेचे सरपंच रामनाथ पावसे, श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पतसंस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ वारूंगसे, कै. अंबादास वाजे यांचे पिताश्री निवृत्ती वाजे, मातोश्री सौ. वाजे, पत्नी ललिता वाजे, चि. तेजस वाजे यांचे सह वाजे परिवार , श्री. थोरात साहेब, माजी सरपंच शरद माळी, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस श्री पेखळे सर, सिन्नर तालुका अध्यक्ष संजय भोर, कै.अंबादास वाजे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन प्रदिप शिंदे, व्हा.चेअरमन भास्कर सदगीर, डुबेरे गावातील विविध संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर ग्रामस्थ यांचे सह प्राथमिक शिक्षक संघाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिमापूजनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.

यावेळी बोलताना खासदार राजाभाऊ वाजे यांनी कै. अंबादास वाजे यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सहकार क्षेत्राची मोठी हानी झाल्याचे नमूद केले. श्री नारायण शेठ वाजे यांनी गावातील सामाजिक विकासामध्ये कै. अंबादास वाजे यांनी घेतलेली भूमिका ही नेहमीच स्मरणात राहील असे मनोगत व्यक्त केले. प्राथमिक शिक्षक संघाचे वतीने संजय भोर यांनी कै. अंबादास वाजे यांच्या कार्याला उजाळा दिला. यावेळेस वाजे परिवाराच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वितरण करण्यात आले डुबरे केंद्राचे केंद्रप्रमुख विजय निरगुडे मुख्याध्यापक रविंद्र सोनवणे यांचे सह डुबेरे शाळेतील शिक्षकांनी व वाजे परिवाराने कार्यक्रमाचे संयोजन केले. डुबेरेवाडी , सिन्नर येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये कै. अंबादास वाजे पुण्यतिथी कार्यक्रम निमित्ताने प्रतिमापूजन व शालेय साहित्य वितरण झाले.कै. अंबादास वाजे जीवन कार्य….कै. अंबादास वाजे यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघात डुबेरे केंद्र प्रतिनिधी ते राज्य अध्यक्ष असा शिक्षक संघातील प्रवास केला आहे . हे करत असताना त्यांनी सर्वसामान्य शिक्षकांच्या अडीअडचणी सुटण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. शिक्षकांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्यांनी शासन दरबारी आपली परखड भूमिका घेतली होती. हे करत असतानाच त्यांनी तालुका ते राज्यस्तरापर्यंत संघटनेची उत्कृष्ट बांधणी करून हजारो कार्यकर्ते जोडले होते. जिल्ह्यातील तसेच राज्यभरातील अनेक शिक्षक सहकारी संस्थांवर त्यांचे वर्चस्व होते. त्यांच्या अवेळी जाण्याने शिक्षकांची अपरिमित अशी हानी झाली आहे.
