
सिन्नर (वसंत गोसावी, सिन्नर प्रतिनिधी) :शिवडे गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवडे व तासदरा, तसेच जनता माध्यमिक विद्यालय, शिवडे या तिन्ही शाळांच्या विद्यार्थ्यांचा संयुक्त वनभोजन सहल सोहळा गावातील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिर व वनदेवी डोंगर परिसरात उत्साहात पार पडला.सकाळी ८ वाजता शाळेच्या प्रांगणात विद्यार्थ्यांची हजेरी घेऊन सर्वांना टोप्या वाटप करण्यात आल्या. शिक्षकांनी आवश्यक सूचना देत शिस्तबद्ध रांगांमध्ये विद्यार्थ्यांना हाऊस निहाय गटांमध्ये उभे केले. कॅप्टन आणि व्हाइस कॅप्टन यांच्या नेतृत्वाखाली शिस्तबद्ध मिरवणुकीत विद्यार्थी निघाले.

भैरवनाथ मंदिरात पोहोचल्यावर विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले आणि त्यानंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. इयत्तानिहाय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गाण्या–नाट्यप्रयोगांनी परिसर दुमदुमला. त्यानंतर विद्यार्थी गावातील प्रथम नागरिक मा. श्री. प्रभाकरभाऊ हारक यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनासाठी मार्गस्थ झाले.रस्त्यातून जाताना विद्यार्थ्यांनी निसर्ग निरीक्षणाचा उपक्रम राबवला. ओढे, ओहोळ, रानफुले, टेकड्या, शेतीतील पिके, झाडे याबाबत विद्यार्थ्यांना माहिती विचारण्यात आली. मुलांनी निसर्गाबद्दल समृद्ध ज्ञान व्यक्त केले.मा. सरपंच श्री. प्रभाकरभाऊ हारक यांच्या फार्मवर तिन्ही शाळांच्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांसाठी स्वादिष्ट स्नेहभोजनाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. स्वतः सरपंच साहेब, त्यांच्या परिवारासह व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. दत्तात्रयभाऊ शिंदे, श्री. उत्तमभाऊ हारक, श्री. गोपाळ शिंदे, श्री. अनिलभाऊ हारक, श्री. अतुलभाऊ हारक, श्री. संजय साबळे यांनी संपूर्ण व्यवस्था सांभाळली.यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री काळे (जि. प. प्रा. शाळा शिवडे),मुख्याध्यापक श्री कैलास शेळके (जि. प. प्रा. शाळा तासदरा),मुख्याध्यापक श्री पांगारकर (जनता विद्यालय शिवडे)आणि SMC अध्यक्ष श्री. दत्तात्रयभाऊ शिंदे यांनी तीनही शाळांच्या वतीने मा. सरपंच श्री. प्रभाकरभाऊ हारक व सौ. शिलाबाई हारक वहिनी यांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली.वदनी कवळ घेता श्लोकानंतर विद्यार्थ्यांना वरणभात, रबडी, कांदाभजी, ब्रेड चायनीज पकोडे अशा रुचकर व पौष्टिक मेन्यूचे गरमागरम जेवण वाढण्यात आले. पिण्याच्या पाण्याची उत्कृष्ट सोय करण्यात आली होती. जेवणानंतर शिक्षक व पोषणआहार कर्मचारी यांनाही स्नेहभोजन देण्यात आले.सर्व शाळांच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संपूर्ण काळजी घेत जबाबदारीने वनभोजन यशस्वी केले. जेवणानंतर विद्यार्थ्यांनी परतीचा प्रवास सुरू केला आणि दुपारी २ वाजता शाळेच्या प्रांगणात वनभोजन सहल आनंदमय वातावरणात संपन्न झाली.संपूर्ण कार्यक्रमामुळे शिवडे गावात आनंद, एकोप्याचा आणि स्नेहाचा माहोल अनुभवायला मिळाला.
