
नाशिक (वार्ताहर) – नवरात्रोत्सवातील नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या नेसून स्वतःला मिरवण्यापेक्षा उन, वारा, पाऊसाची तमा न बाळगता कष्ट उपसणाऱ्या समाजातील उपेक्षित मात्र आपापल्या क्षेत्रात कार्यकतृत्वाला झेंडा रोवणाऱ्या महिलांची साडीचोळीने ओटी भरून त्यांचा सन्मान करत, आदिशक्तीचा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा करण्यार्या दाभाडी येथील (सध्या नाशिक स्थित) अहिरे परिवाराच्या सामाजिक दातृत्वाची पंचक्रोशीत प्रशंसा होत आहे.

समाजाचे आपण देणे लागतो या उदात्त भावनेतून नवरात्रोत्सवात रोजच्या धकाधकीच्या जीवनातल्या खऱ्या खुऱ्या पण, समाजाकडून दुर्लक्षित असलेल्या नवदुर्गाचा साडी भेटीचा सुखद धक्का, आनंदाच्या पेरणीचा अन् गहिवर दाटून आणणारा उपक्रम ठरला आहे. देवीचा भक्ती सोहळा दिखाऊ उत्सवात परावर्तित होऊ पाहत असतांना नऊ दिवस विविध रंगाच्या साड्या परिधान करण्याची महिला वर्गाची हौस सर्वश्रुत आहेच.

सध्या नऊ दिवसांसाठी नऊ रंगांच्या साड्यांची खरेदीचा ट्रेंड आहे. मात्र, या रंगबिरंगी साड्या वर्षभर पडून असतात हा महिला वर्गाचा अनुभवही बोलकाच. यावर उपायाची मात्रा येथील अहिरे दांपत्याला गवसली आहे. विवेकानंद केंद्राचे माजी नगरप्रमुख तथा उपक्रमशील प्रा. अमोल अहिरे व सामाजिक कार्यकर्त्यां अमृता अहिरे या दांपत्यानी साड्या खरेदी करून दरदिवशी विविध कामात व्यस्त महिलांना प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी भेटून या कर्तृत्ववान महिलांची ओटी भरवली. हा अनोखा स्त्री गौरव सोहळा नवरात्र काळात दिशादर्शक व अनुकरणाचा आत्मविश्र्वास पेरणारा ठरला आहे.

रोजच्या उदरनिर्वाहासाठी कोणापुढेही हात न पसरता, स्वाभिमानाने आपले घर, कुटुंबाचा गाडा हाकताना, कष्ट करून ताट मानेने जीवन जगणाऱ्या समाजातील अशा नऊ दुर्गांचा सन्मान यावेळी त्यांनी केला. समाजातील या खऱ्या खुऱ्या ऊर्जावान दुर्गाचा सन्मान करतांना त्यांच्या उंचीपुढे आपल्यातील थिटेपणाची वेळोवेळी जाणीव होते. अशी भावना प्रा. अमोल अहिरे यांनी यावेळी व्यक्त केली.*चौकट – अहिरे दाम्पत्याची सामाजिक बांधिलकी…* स्वामी विवेकानंदांच्या ‘मानवसेवा हीच खरी माधव सेवा’ या उक्तीनुसार अहिरे दाम्पत्याने यापूर्वीही आपल्या मुलाच्या वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळून कोरोना संक्रमणातील टाळेबंदीच्या काळात गरजू दिव्यांगांना किराणामालाचे वाटप केले होते. आपण समाजाचे देणे लागतो या जाणिवेतून मुलांवर चांगले संस्कार व्हावेत या उद्देशाने त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या अनाथ मुलांसमवेत, अंधशाळेतील मुलांसमवेत तसेच मुकबधीर मुलांसमवेत त्याचप्रमाणे वृध्दाश्रमात आपल्या मुलाचा (रामचा) वाढदिवस साजरा करुन सामाजिक बांधिलकी जपली होती. यापूर्वी देखील त्यांनी नाशिक येथे उच्च शिक्षणासाठी आलेल्या दोन माजी विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृहात प्रवेश मिळेपर्यंत आपल्या घरात दोन महिने आश्रय दिला होता. *चौकट -* प्रतिवर्षी स्त्रिया उगीचच नऊ रंगांच्या साड्या खरेदी करतात आणि केवळ नवरात्रोत्सवातील नऊ दिवस वापरतात. तद्नंतर त्या साड्या वर्षभर पडूनच राहतात. तसे बघितले तर नवरात्र आणि देवीच्या रंगीत साड्या यांचा कुठेही, काहीही, कसलाही दुरान्वयेही संबंध नाही. यापेक्षा समाजातील खर्याखुर्या मात्र गरजू नऊ दुर्गाची साडीचोळीने ओटी भरली, तर त्या दुर्गाच्या चेहर्यावरील आनंद व समाधान पाहून खरेच आदिशक्ती जगदंबा मातेचा आशीर्वाद प्राप्त होईल, या उदात्त हेतूने व सामाजिक बांधिलकीतून सदर उपक्रमास गत पाचवर्षापूर्वी राबविण्यास सुरुवात केली. सदर उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. आगामी काळात देखील सदर गौरीउत्सव प्रतिवर्षी नियमित व अखंडितपणे कायम ठेवण्याचा मानस आहे. *अमृता अहिरे, सामाजिक कार्यकर्त्या**सन्मानाने कष्टकरी दुर्गाचे डोळे पाणावले…*

नवरात्रोत्सवातील नऊ दिवस आपल्या परिवाराचा गाडा हाकणाऱ्या कर्तृत्ववान दुर्गांचा सन्मान करण्यात आला त्यात१. नलिनी बलकवडे – विड्याची पाने विक्रेत्या२. सरुबाई काळे – शेतमजूर ३. दिपाली शेलार, नासा अमेरिकेसाठी निवड झालेल्या प्राथमिक शिक्षिका४. श्रीमती रमाबाई बागूल, भाजी विक्रेत्या ५. जयश्री पवार शिवणकाम व बालसंस्कार वर्ग ६. श्रीमती भिमाबाई खरात, फळ विक्रेत्या७. श्वेता डोके दुचाकी वाहने विक्रेत्या ८. श्रीमती मथुराबाई झाल्टे केरसुणी विक्रेत्या९. पूनम डावरे, दगडी वरवंटा पाटा विक्रेत्या या कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. कामाच्या ठिकाणी झालेल्या हृदयस्थ सन्मानाने कष्टकरी महिलांचे डोळे पाणावले.
