
नाशिक:-(प्रतिनिधी ) सश्रद्ध मनाने आपण भगवंताच्या चरणी लीन झालं पाहिजे. जीवनात अनेक अडचणी आणि संकटं येत असतात. त्यांच्यावर मात करण्यासाठी भावभक्तीचा मार्ग अनुसरला पाहिजे. कारण भक्तीशिवाय मार्ग सापडत नाही, असे प्रतिपादन हभप रमेश वाघ यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमाचे १८९वे पुष्प गुंफताना ‘महाराष्ट्राचे विचारदुर्ग’ या पुस्तकावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते होते.
रमेश वाघ पुढे म्हणाले की, संत साहित्याच्या विचारांची गंगा पोहचविणाऱ्या थोर संतांचे विचार या पुस्तकातुन मांडले आहेत. संतांची योग्यता कळली तरच आपले जीवन परिपूर्ण होते. महान अशा दहा संतांचे विचार या पुस्तकात आहेत. अनुभव आणि भावनेचा ओलावा संतांच्या आचरणात आहे, असेही ते म्हणाले.
सुहास टिपरे आणि श्रीकांत जाधव या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथ भेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर योगाचार्य अशोक पाटील यांनी आभार मानले.
दरम्यान येत्या मंगळवारी (७) रोजी शाहीर प्रसाद अंतरवेलीकर ‘तमाशाचा तमाशा’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत
