
ईगतपुरी :- (तालुका प्रतिनिधी- नवनाथ गायकर ) राज्यातील सत्ताधारी महायुतीतील तीन्ही घटक पक्ष आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका एकत्र पणे लढवणार असल्याचे जवळपास निश्चित संकेत मिळत आहे. तर दुसरी कडे महा विकास आघाडीत मात्र संभ्रमाचे वातावरण स्पष्ट दिसत आहे. शिवसेना उबाठा गट व मनसेचे मनोमिलन होतानांचे संकेत मिळत आहे.यामुळे मनसे व शिवसेना एकत्रीत लढेल काय ? अशी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. शिवसेना व मनसे युती झाली तर महा विकास आघाडीतील कॉंग्रेस व रा.कॉ.(श.प.गट) यांची भुमिका काय राहिल ? शिवसेना उबाठा म.वि.आ तुन बाहेर पडेल का ? कि मनसेच्या रुपाने चौथा भिडु म.वि.आ त दाखल होईल यावर अनेकानेक अंदाज वर्तवले जात आहे.या सगळयाबाबत संभ्रम दुर झाल्यावरच पुढील चित्र बहुधा स्पष्ट होईल. ईगतपुरी तालुक्यापुरते बोलायचे झाले तर जि.प.चे पाच गट व पं.स.चे दहा गण अशा जागा आहे.महायुतीचे येथे हिरामण खोसकर हे आमदार असुन

माजी आमदार सौ.निर्मला गावित, काशिनाथ मेंगाळ, शिवराम झोले व पांडुरंग गांगड असे सगळेच परस्पर विरोधी नेते आता एकाच महायुतीत आहेत. महायुतीमुळे हे नेते एकत्र असले तरी एकमेकाचे ते पारंपारीक विरोधक आहे त्यामुळे व्यासपिठावर हसत फोटो काढणारे पाठीमागे एकमेकाचे हात पाय ओढण्याचे नेहमीची कामे करतील की महायुतीचा धर्म पाळतील याबाबत मोठी उत्सुकता असेल.

याशिवाय माजी जि.प. सदस्य गोरख बोडके, अँड. संदिप गुळवे, उदय जाधव , भाजपचे गोपाळा लहांगे, भास्कर गुंजाळ आदी मंडळीही नाईलाजाने एक होतात कि कसे याबाबतही उत्सुकताच असेल. यावेळी सगळयात लक्षवेधी लढत ही घोटी जि.प.गटात असेल.येथुन या गटावर सलग वीस वर्षापासुन सातत्याने एकहाती वर्चस्व गाजवणारे उदय पा. जाधव हेच महायुतीचे उमेदवार असतील ही चर्चा आहे. तर उबाठा शिवसेनेचे निवृत्ती पा. जाधव हे ही प्रबळ दावेदार मानले जात आहे.गतवेळी त्यांचा अगदी निसटता पराभव झाला होता.मनसेचे तरुण, तडफदार उमेदवार संदिप किर्वे यांनी गतवेळी आश्चर्यकारक मते मिळवत प्रस्थापितानां हादरे दिले होते.पण यावेळी मनसेच्या भुमिकेवरच किर्वेची भुमिका बहुतेक ठरेल असे दिसतेय. ईगतपुरी तालुक्यातील उर्वरीत चार गट टाकेद (खेड भैरव) धामणगाव, शिरसाटे (धारगाव) कावनई, वाडिवर्हे व नांदगाव सदो हे चारही गट राखीव असल्याने प्रस्थापिंत नेते प्रचंड नाराज झाले आहेत.अनेकानीं जय्यत तयारी केली होती.या निमित्ताने भेटी गाठी व खर्च केला होता तो वाया जाऊन शांत बसण्याची वेळ त्यांचेवर आली आहे. राखीव जागा वाढल्याने सर्वच दिग्गज नेते आता आपल्या कुटुंबियांसाठी सरसावणार आहेत असे दिसतेय. वाडिवर्हे जि.प.गटात मोठी गर्दी होण्याची ळक्यता आहे.यात भाजपचे गोपाळा लहांगे, राष्ट्रवादीचै तुकाराम वारघडे यांचेसह माजी आमदार सौ. निर्मला गावित व काशिनाथ मेंगाळाचेंही या गटावर लक्ष असेल. टाकेद जि.प.गटात सलग दोनदा जि.प.सदस्य झालेले हरिदास लोहकरे व नांदगाव सदो गटात कावजी ठाकरे हे विदयमान पुन्हा नशिब आजमावण्याची शक्यता आहे. कावनई जि.प.गट गटावर महायुतीतच रा.कॉ. व शिवसेना यांचेत रस्सीखेच होईल असे दिसते. मागील वेळी शिवसेनेचे तालुक्यावर निर्विवाद वर्चस्व होते.पण यावेळी शिवसेनेच्या ताटात भाजप व रा.कॉ.हे मित्रपक्ष आल्याने जागावाटपात रस्सीखेच होऊन नाराजी, बंडखोरी ही पहायला मिळेल हे नक्की. तर म.वि.आ पुढे सक्षम चेहर्याचा शोध व महायुतीतील नाराजांवरच भिस्त असेल.
