
नांदगाव (प्रतिनिधी )- मविप्र संचलित न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात ३ ऑक्टोंबर ‘अभिजात मराठी भाषा सन्मान दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी मराठी भाषेतील आद्यग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’ चे कर्ते जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊली व विद्येने आराध्य दैवत सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

मराठी भाषेच्या अभिजात भाषेचे महत्त्व सांगताना विद्यालयाचे उपशिक्षक श्री. अशोक मार्कंड यांनी महाराष्ट्रातील सर्व संत ,महंत व लेखक ,कवी, नाटककार यांच्या कार्याला उजाळा दिला .विशेष म्हणजे चक्रधर स्वामी ,संत ज्ञानेश्वर ,संत तुकडोजी महाराज, वि स खांडेकर ,पु ल देशपांडे, वि. वा. शिरवाडकर, भालचंद्र नेमाडे ,आनंद यादव, विठ्ठलराव गाडगीळ ,बाबुराव बागुल, अशोक उगावकर ,पद्मा गोळे, वसंत बापट ,बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ,फ मू शिंदे ,ना सी फडके अशा अनेक मराठी लेखकांच्या कार्याविषयी गुणगौरव आपल्या भाषणामध्ये मांडला . मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी सांगितले की,मराठी भाषा म्हणजे केवळ संवादाचे साधन नव्हे ,तर ती आपली संस्कृती, भावविश्व आहे. अभिजात दर्जा म्हणजे या भाषेचा वैभवाचा, प्राचीन परंपरेचा आणि साहित्यिक समृद्धीचा गौरव आहे. या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
