
सिन्नर येथील कार्यक्रमात वैज्ञानिक चमत्कार प्रात्यक्षिक करताना डॉ.ठकसेन गोराणे ,समवेत प्राचार्य शेळके, डॉ .श्यामसुंदर झळके,हरिभाऊ तांबे इ
वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज….डॉ.गोराणेसिन्नर (प्रतिनिधी)समाजात विवेकी विचार,अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव डॉ.ठकसेन गोराणे यांनी केले. सिन्नर येथील मविप्र समाजाचे अध्यापक विद्यालयात वैद्न्यानिक दृष्टीकोन व चमत्कार प्रशिक्षण सादरीकरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य विनोद शेळके,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके,तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे,कार्याध्यक्ष सुकदेव वाघ आदी उपस्थित होते.डॉ. ठकसेन गोराणे यांनी समाजात अंधश्रद्धा किती खोलवर रुजलेली आहे व त्यामुळे आपले कसे नुकसान होते हे त्यांनी सप्रयोग सिद्ध केले.

जगात कोणताच चमत्कार घडत नाही,त्यामागे कार्यकारण भाव असतो. भोंदू बाबा नेमका याचाच गैरफायदा घेऊन समाजाची फरवणूक व आर्थिक शोषण करतात.यावेळी डॉ. गोराणे यांनी पाण्याने दिवा प्रज्वलित करणे,रिकाम्या ताब्यातून पाणी काढणे, दोरी ची गाठ सोडविणे, बाहेर जाऊन न पाहता वस्तू ओळखणे या सारखे हातचलाखीचे प्रयोग करून विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले.यावेळी अंनिसचे तालुकाध्यक्ष हरिभाऊ तांबे तसेच जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या चळवळीत तरुण तरुणांनी सहभागी होऊन विवेकी व अंधश्रध्दामुक्त समाज घडविण्याच्या प्रक्रियेत सक्रिय होण्याचे आवाहन केले.यावेळी अध्यापक विद्यालयाचे शिक्षक रुपाली पाटील,सीमा सोनवणे,स्वप्नाली पाटील,दिपाली गारे,अनंता लोंढे,सचिन कुलथे,सुनील नरोडे आदी उपस्थित होते.
