
सिन्नर (प्रतिनिधी ) डॉ. रूपाली पाटील भारस्कर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पीएच.डी. प्रदान मराठा विद्या प्रसारक समाज संचलित अध्यापक विद्यालयातील अधिव्याख्याता डॉ. रूपाली पाटील भारस्कर यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शिक्षणशास्त्र (आंतरविद्याशाखीय) विषयाअंतर्गत विद्यावाचस्पती (Ph.D.) पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली. त्यांनी नाशिक येथील ॲड. विठ्ठलराव हांडे शिक्षण शास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली “कुमारावस्थेतील विद्यार्थ्यांची सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी कृतिकार्यक्रमाची निर्मिती व परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला. अलीकडील काळात कुमारावस्थेतील मुला मुलींच्या वर्तन विषयक समस्या प्रकर्षाने समोर येत आहेत. या वयातील मुला मुलींमध्ये सहनशीलता, संवेदनशीलता, सहकार्य, सामाजिक जाणीव या सामाजिक कौशल्यांचा अभाव दिसून येतो. डॉ. पाटील त्यांच्या संशोधनामुळे शिक्षक व पालकांना आपल्या मुलांमध्ये सामाजिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी नवीन दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे, शिक्षणाधिकारी डॉ. भास्कर ढोके, डॉ. नितीन जाधव, सिन्नर तालुका मविप्र संचालक श्री. कृष्णाजी भगत यांनी त्यांचे अभिनंदन केले.
