
नाशिक (प्रतिनिधी )विकसित महाराष्ट्र २०४७ पर्यंतचे धोरण निश्चितीसाठी खेळाडू, संघटक, प्रशिक्षक यांच्यासमवेत संवाद साधण्यात आला. राज्याचे क्रीडा धोरण तयार करताना खेळाडूंच्या हिताचा विचार करण्यात येईल. खेळाडूंना आवश्यक सोयीसुविधा वेळेत उपलब्ध होतील, अशी ग्वाही क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी प्रश्नाच्या उत्तरात दिली.शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आज सकाळी गुरूदक्षिणा सभागृहात विकसित महाराष्ट्र २०४७ युवा व क्रीडा संवाद (नाशिक विभाग) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता,त्यावेळी ते बोलत होते.

क्रीडापीठावर क्रीडाआयुक्त शीतल उगले- तेली, अर्जुन पुरस्कार प्राप्त धावपटू कविता राऊत, आंतरराष्ट्रीय नौकानयनपटू दत्तू भोकनळ, क्रीडा उपसंचालक संजय सबनीस, क्रीडा उपसंचालक स्नेहल साळुंखे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील (नाशिक), रवींद्र नाईक (जळगाव), मनोहर पाटील (धुळे) आदी क्रीडापीठावर उपस्थित होते.ना. ॲड. कोकाटे म्हणाले की, सन २०४७ पर्यंतचे क्रीडा धोरण तयार करताना सर्व सूचना, अभिप्राय विचारात घेतले जातील. त्यासाठी जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयांमध्ये सूचना पेटी बसविण्यात येईल. जिल्हा क्रीडा संकुलांच्या देखभालीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. नंदुरबार येथे सिथेंटिक ट्रॅक उपलब्धतेसाठी आठ दिवसांत कार्यवाही करण्यात येईल. तसेचखेळांच्या विकासासाठी हरियाणा, ओडिशा राज्य करीत असलेल्या प्रयत्नांची माहिती घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यात येईल. खेळाडू, प्रशिक्षकांना देण्यात येणारे पुरस्कार वितरणासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात येईल. मैदाने विकसित करण्यासाठी सहकार्य करण्यात येईल.

त्याबरोबरच आवश्यक साधनसामग्री, साहित्य उपलब्ध करून देण्यात येईल. क्रीडांगण विकासासाठीचा निधी सात लाखावरून २५ लाखापर्यंत वाढविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे क्रीडामंत्री ॲड. कोकाटे यांनी सांगितले.क्रीडा आयुक्त श्रीमती तेली म्हणाल्या की, राज्य शासनाने ११८ खेळाडूंना शासकीय नोकरीत सामावून घेतले आहे. राज्य क्रीडा विकास निधीची स्थापना करण्यात आली आहे. मिशन लक्षवेध अंतर्गत १२ खेळांची निवड करण्यात आली आहे. तेथे अत्याधुनिक सुविधा, साधने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. प्रतिभावान खेळाडूंची निवड करून त्यांना प्रशिक्षित करून उद्याचे ऑलिम्पिकवीर घडतील. आगामी काळात क्रीडा विभागाच्या कामकाजात एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.यावेळी आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या धावपटू कविता राऊत, नौकानयनपटू दत्तू भोकनळ.. श्रीमती शैलजा जैन,ॲड. गोरख बलकवडे, संजय चव्हाण, मंदार देशमुख, डॉ. मीनाक्षी गवळी, हेमंत पाटील, (नाशिक), उमेश चौधरी, आनंद पवार, मोसिन शेख, संजय भामरे (धुळे), राजेंद्र जाधव, राजवीरसिंह राजपूत, प्रशांत कोल्हे, काजल भाकरे (जळगाव) आदींनी विविध सूचना केल्या. त्यांनी सांगितले की, शाळांमध्ये क्रीडा शिक्षक भरती करावी, प्राथमिक वयोगटात पासून क्रीडा शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिल्यास नवीन पिढी सुदृढ तयार होईल व जागतिक स्पर्धांमध्ये मार्गदर्शनामुळे भारताचे नाव मोठे करतीलत्यासाठी प्रशिक्षक नियुक्त करावेत, क्रीडा सुविधा मिळाव्यात, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदान व्हावे, सरावासाठी सुविधा, क्रीडा संकुलास कायमस्वरूपी निधी, एक जिल्हा एक संघटना करावी, क्रीडा विभाग वेगळा करावा, क्रीडा अनुदान सुरू करावे, डोपिंग चाचणीची व्यवस्था निर्माण करावी, क्रीडा स्पर्धा आयोजनाचा खर्च वेळेत मिळावा, ग्रामीण भागामध्ये मधील खेळाडूंना शालेय क्रीडा स्पर्धेची फी माफ करावी. महानगरपालिकेमध्ये व जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करावी. क्रीडा संघटना सक्षम कराव्यात, शालेय मैदानांना सुविधा मिळाव्यात, खेळाडूंना प्रवासात सवलत द्यावी, गाव तेथे क्रीडांगण असावे, विद्यापीठांचे क्रीडा धोरण असावे, csr निधी स्पर्धांसाठी वापरण्यात यावा. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या बजेटच्या पाच टक्के निधी क्रीडा स्पर्धांवर व क्रीडा खेळाडूंसाठी खर्च करण्याचा जीआर असतानाही त्याची अंमलबजावणी होत नाही.प्रतिभावान खेळाडूंना वेळीच मदत करावी, खेळाडूंसाठी स्वतंत्र वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात आदी अनेक सूचना केल्या. या सगळ्यांची नोंद घेऊन त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी ग्वाही क्रीडा मंत्र्यांनी दिली.
