
रेटून पटवलं
घोटून पढवलं
गांधी आता पुरत नाही
दिशा बदला, मुक्काम हलवा.
..गांधी पुरत नाही,
गांधी उरतही नाही
पण कितीही केला प्रवास तरी
सावली याची सरत नाही…
सत्य लपवले
झूठ प्रसवले
वाट अडवली,
पाय ओढले
पायावरती डोकेही ठेवले…
काटे रुतवले
हार सजवले
फुला-फुलांतून जहरही पेरले…
फुलांनी सजत नाही
रक्ताने माखत नाही
वधानेही हा बधत नाही
अन् काही केल्या थांबत नाही…
गांधी . . . कळत नाही
कळणारही नाही
विसर म्हणता
विसरतही नाही…
चार पिढ्या मेल्या आमच्यापण…
हा बाबा काही मरत नाही…!
:राजेन्द्र गुंजाळ. नाशिक (9766031735)
