
सिन्नर | मंगळवार, ३० सप्टेंबर २०२५ —
सिन्नर शहरातील कन्याशिक्षणाचा प्रकाश सर्वदूर पसरवणाऱ्या मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालयाने आपल्या ५९ वर्षांच्या उज्ज्वल वाटचालीची यशोगाथा साजरी करत हीरक महोत्सवी वर्षात दिमाखात प्रवेश केला. १ सप्टेंबर १९६६ रोजी स्थापन झालेल्या या विद्यालयाने ६० व्या वर्षात पदार्पण करत नव्या उमेदीने पुढच्या प्रवासाची सुरुवात केली आहे.

हीरक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी विद्यालयात एक उत्साहपूर्ण व भारावलेले वातावरण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सन्माननीय देणगीदार मनिषा चांडक व प्रसिद्ध उद्योजिका प्रेरणा बेळे यांची विशेष उपस्थिती लाभली. यासोबतच संस्थेचे कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी, सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला,गटशिक्षणाधिकारी विजय बागुल,संकुल प्रमुख सारंग इंगळे,शालेय समिती अध्यक्ष ॲड. श्रीराम क्षत्रिय,हीरक महोत्सव समितीच्या उपाध्यक्षा माधवी पंडित, बापूसाहेब पंडित,सहखजिनदार हेमंत देशपांडे,मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले आणि पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे मंचावर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात शहरातून निघालेल्या प्रभात फेरीने झाली. लेझीम, स्काऊट-गाईड,टाळपथक, ध्वजपथक व घोषपथक यांनी सादर केलेली मिरवणूक शिस्तबद्धतेचा व संस्कारांचा झंझावात ठरली.
विद्यार्थिनींनी दुर्गास्तुती सादर करत कार्यक्रमाला सुरेल सुरुवात केली. त्यानंतर आयो रे शुभ दिन या स्वागतनृत्यातून आनंदाचा उत्सव साकारला गेला.शाळेच्या यशोयात्रेची गौरवगाथा विद्यार्थिनींनी नवदुर्गांच्या रूपात प्रभावीपणे सादर करत सर्वांचे मन जिंकले.

शालेय मंत्रिमंडळाने हीरक महोत्सवी वर्षासाठी सामूहिक संकल्प करून संकल्प घट स्थापन केला आणि शिक्षण, संस्कार व समाजासाठी समर्पित राहण्याची शपथ घेतली.कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मनिषा चांडक यांनी, “चांडक कुटुंबीयांची शाळेशी असलेली नाळ ही एक सामाजिक बांधिलकी असून, विद्यार्थिनींच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आमचा पाठींबा सदैव राहील,” असे भावनिक उद्गार काढले.प्रेरणा बेळे यांनी, “गुरुंच्या मार्गदर्शनामुळेच जीवन घडते. गुरु हीच खरी संपत्ती आहे,” असे अधोरेखित केले.कार्याध्यक्ष मारुती कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतातून, “चांगले करिअर जसे महत्त्वाचे आहे, तशीच चांगली आई व कुशल गृहिणी बनण्याची भूमिकाही तितकीच मोलाची आहे.” असे मौलिक विचार मांडले.सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी “आपल्या नागरिकत्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडत देशाच्या प्रगतीसाठी सजग रहा,” असे आवाहन केले.

या सोहळ्याचा विशेष आकर्षण म्हणजे हीरक महोत्सवी गौरव चिन्हाचे अनावरण हे होते, जे मान्यवरांच्या हस्ते साजरे झाले.शाळेच्या पहिल्या बॅचपासून विविध वर्षांतील यशस्वी माजी विद्यार्थिनींचा सन्मान सोहळा सर्वांच्याच डोळ्यांत आनंदाश्रू आणणारा ठरला.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापिका सुनिता कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अत्यंत कौशल्य व समर्पणाने कामगिरी बजावली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका कर्डिले यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षिका सुवर्णा सोनवणे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलिमा दुसाने यांनी आणि आभार प्रदर्शन ॲड. श्रीराम क्षत्रिय यांनी केले. शाळेच्या वर्धापनगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
