
नाशिक:-( प्रतिनिधी ) प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या क्षणांनी तणाव निर्माण होतो. या तणावासह मानवी जीवनात एकमेकांशी वागण्या-बोलण्यामुळे जो विसंवाद निर्माण होतो. त्यातूनच बंडखोरीचा जन्म होतो, असे प्रतिपादन सामाजिक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अर्जुन कोकाटे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात ‘अस्वस्थ शतक’ या पुस्तकावर १८७वे पुष्प गुंफताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते होते. श्री.कोकाटे पुढे म्हणाले की, सामाजिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाला सामोरे गेल्याशिवाय मानवी मूल्यांचा शोध घेता येत नाही. जगात वावरायचं असेल तर मन आणि भावनांचे कृत्रिम मनोरे बांधून यश मिळत नाही. नव्या समाजाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शोषणमुक्त समाज निर्माण झाला पाहिजे. संग्रहातील सलाम, अस्वस्थ शतक, इतिहास बदलण्यासाठी, कोंडलेले तुफान, आक्रोश, वेदनांच्या ज्वाला, जात, दलाल अशा कवितांमधून नव्या विचारांना साद घातली आहे. काळजाला ठेच लागल्याशिवाय कविता निर्माण होत नाही; हे शाश्वत सत्य आहे, असेही ते म्हणाले. करुणासागर पगारे आणि बाबासाहेब कोकाटे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा.गंगाधर अहिरे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (३) रमेश वाघ ‘महाराष्ट्रातील विचारदुर्ग’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
