
लासलगाव, दिनांक २९ सप्टेबर ( प्रतिनिधी ) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना +2 स्तर विभागाच्या वतीने दिनांक 22 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर 2025 हा ‘राष्ट्रीय सेवा योजना आठवडा’ म्हणून साजरा करण्यात आला. याअंतर्गत विविध उपक्रमांचे व व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले. या व्याख्यानमाला सप्ताहाच्या समारोप प्रसंगी आज दिनांक 29 सप्टेंबर हा दिवस ‘विश्व हृदय दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. तसेच 28 सप्टेंबर हा दिवस ‘शहीद भगतसिंग यांची जयंती’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रमुख वक्ते उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जयंतीचे औचित्य साधून व्याख्यानमालेचे सातवे पुष्प गुंफले. तर कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख वक्ते विज्ञान विभाग प्रमुख प्रा.जितेंद्र देवरे यांनी व्याख्यानमालेचे आठवे पुष्प गुंपले. त्यांनी जागतिक विश्व ह्रदय दिवस निमित्त ‘आरोग्य व आहार’ याविषयी स्वयंसेवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व सरस्वती माता, स्वामी विवेकानंद आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमा पुजनाने झाली.

कार्यक्रमास वक्ते म्हणून लाभलेले प्रा.उज्वल शेलार यांनी शहीद भगतसिंग यांच्या जीवन कार्याविषयी मनोगत व्यक्त करतांना सांगितले की शहीद भगतसिंग यांचे जीवन कार्य तरुणांना प्रेरणा व मार्गदर्शन देणारे आहे. त्यांनी आपल्या जीवनामध्ये वाचनाला त्याचबरोबर देशसेवेला जे महत्त्व दिलं त्यातून प्रेरणा घेऊन आपणही आपल्या देशाची सेवा करण्यास सज्ज असले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमास लाभलेले दुसरे वक्ते प्रा.जितेंद्र देवरे यांनी स्वयंसेवकांना ‘आरोग्य व आहार’ याविषयी मार्गदर्शन करतांना आरोग्य चांगले ठेवण्यासाठी संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, पुरेशी झोप घेणे, तणाव कमी करणे, स्वच्छता पाळणे आणि नियमित वैद्यकीय तपासण्या करणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन केले. यावेळी मंचावर प्रा.महेश होळकर, प्रा.रामनाथ कदम, प्रा.दत्तात्रय गायकवाड, प्रा.नितीन शिंदे, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे व प्रा.सुनिल गायकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कु.अर्चना आव्हाड आणि धनश्री राजोळे या विद्यार्थिनींनी केले, प्रास्ताविक कु.श्रेया सूर्यवंशी आणि सिद्धी कदम यांनी केले, वक्ता परिचय कु.यज्ञेश जेउघाले व सार्थक भडांगे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन कु.कल्याणी ठोके या विद्यार्थीनीने केले. राष्ट्रीय सेवा योजना सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदरावजी होळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व रा.से.यो. स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी सर्व रा.से.यो.स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
