
सिन्नर ( प्रतिनिधी ) उत्तर महाराष्ट्रात शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संस्थांमध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे योगदान महत्वपूर्ण आहे.या संस्थेची सिन्नर मधील एक शाखा म्हणजे मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई चांडक कन्या विद्यालय,मुलींना उपक्रमशीलता आणि विविधांगी शिक्षणाद्वारे प्रगतीपथावर नेतांना आत्मविश्वासाचे बळ देणारी आणि फक्त मुलींकरता चालवली जाणारी चांडक कन्या विद्यालय ही सिन्नर तालुक्यातील एकमेव शाळा आहे.सन २०२५ हे साल शाळेचे हीरक महोत्सवी वर्ष आहे.या हीरक महोत्सवी वर्षात शाळेच्या अनंत आठवणींचा आढावा घेताना मन भूतकाळात जाते. १९६५-६६ चा काळ मुलींनीही शिकून समर्थ व्हावे असे शर्थीचे प्रयत्न भारतात चालू असतानाच १ सप्टेंबर १९६६ साली संस्थेने मातोश्री चंद्रभागाबाई व अयोध्याबाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ चांडक परिवाराने दिलेल्या उदार देणगीतून स्वतंत्र मुलींच्या शाळेची स्थापना केली.या शाळेच्या इमारतीसाठी कै.रामनाथ शेठ चांडक यांच्या दूरदर्शीपणाचा वरदहस्त लाभला.त्यांचा मुलींच्या शिक्षणासाठी असलेल्या तळमळीचा दृष्टिकोनही यातून जगासमोर आला. आज आपल्याला नूतन वास्तू त्या जागेवर उभी असलेली दिसते आहे. पण त्या काळातील शाळेला लागणाऱ्या अनेक गरजाही अनेक दानशूर व्यक्तिमत्त्वांनी त्या काळात पूर्ण केल्या आणि आजही ही दानाची परंपरा पालक आणि समाजातील दानशूर देणगीदार यांच्या माध्यमातून चालू आहे. आजवर शाळेस खंबीर,कुशल,विवेकी,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या शिस्तप्रिय व उत्तम प्रशासक असलेल्या महिला मुख्याध्यापक आणि शिक्षकांची परंपरा लाभली. त्यामुळे शाळेचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहिला शाळेतील अनेक विद्यार्थिनीही परीक्षा,नाट्य,अभिनय,वक्तृत्व,क्रीडा अशा सर्वच क्षेत्रात आपला वैशिष्ट्यपूर्ण ठसा उमटवीत आहेत. विद्यार्थिनींची वाढती संख्या आणि अनेक शैक्षणिक गरजा ओळखून संस्थेने अद्ययावत व परिपूर्ण अशी भव्य इमारत आज त्या जागेवर उभी केली आहे. विज्ञान व तंत्रज्ञान यांचे विविध प्रयोग करण्यासाठी ‘अटल लॅब’ ची स्थापना, काळाची गरज ओळखून फंक्शनल इंग्लिश चे विशेष शिक्षण दिले जाते. स्पर्धा परीक्षा सहज व सोप्या जाव्यात यासाठी एन.टी.एस., इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा,शासकीय चित्रकला परीक्षा,गणित/विज्ञान ऑलम्पियाड,संगणक छंद मंडळ, मराठी वाड्:मय मंडळ याद्वारे विद्यार्थिनींना लेखनकला व काव्य गुणांना चालना मिळते तसेच नाट्यकलेस प्रोत्साहन म्हणून कै.वा.श्री.पुरोहित एकांकिका स्पर्धा यांसारख्या स्पर्धांमधून विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव दिला जातो. शाळेच्या विद्यार्थिनी कुठल्याही क्षेत्रात मागे राहणार नाहीत याची काळजी घेतांना खेळाच्या मैदानावर त्या आघाडीवर राहतील याची विशेष काळजी घेण्यात येते.एकूणच अनंत उपक्रमांची रेलचेल त्यामुळे इथली प्रत्येक विद्यार्थिनी भान हरपून शिकत असते.अनेक परीक्षांमधून गुणवत्ता यादीत आपल्या नावाचा ठसा उमटवणे ही देखील या शाळेची सातत्याने चालणारी परंपरा आहे. ज्ञानदानाची समर्थ आणि उत्तम पद्धती त्यामुळे सिन्नरकर पालकांचा अलोट विश्वास असणारी आणि विद्यार्थिनींसाठी संजीवन ठरलेली ही शाळा आज मोठ्या दिमाखात ६०व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. याचा अत्यंत आनंद,समाधान आणि कृतार्थता आज शालेय व्यवस्थापन,संस्था,पालक या साऱ्यांच्याच मनात आहे.’चांडक कन्या विद्यालय’ही आमची शाळा हा आमचा अभिमान आहे अशा भावना प्रत्येक माजी व आजी विद्यार्थिनी आज व्यक्त करताना दिसतात. भविष्यातही शाळेला भरभरून यश मिळो आणि नव्या युगातील समर्थ ‘स्त्री’ या शाळेतून घडत राहो या मनापासून शुभेच्छा! – सौ.माधवी पंडित. मा.मुख्याध्यापिका चांडक कन्या विदयालय सिन्नर
