
सिन्नर (प्रतिनिधी वसंत गोसावी,) : ज्ञानदीप प्रज्वलित करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान होणे हीच खरी संस्कृतीची ओळख होय. अशाच ओळखीला उजाळा देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पाटोळे येथील कर्तृत्ववान शिक्षक कैलास पवार यांचा नुकताच गावकऱ्यांच्या वतीने दिमाखदार सत्कार करण्यात आला. सिन्नर येथील कै. अंबादासजी वाजे प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था यांच्यावतीने प्रदान करण्यात आलेल्या गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित झाल्यानंतर पाटोळे ग्रामस्थांनी उत्साहाच्या वातावरणात हा सत्कार सोहळा साजरा केला.

या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदाम पानसरे, मुख्याध्यापक वसंत गोसावी, तसेच मल्हारी चकोर, निवृत्ती कराड, सुनिल सांगळे, देविदास आप्पा कराड, पांडुरंग सांगळे, विलास खताळे, सजन सांगळे, माधव खताळे आदी मान्यवर उपस्थित होते.शाळेच्या शिक्षिका सुनिता बर्वे, प्रतिभा बैरागी, स्वाती खताळे, सुनिता भिसे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याला भरभरून प्रतिसाद दिला. गुरुंच्या कार्याला ग्रामस्थांची दाद मिळाल्याने वातावरणात आनंदाचे तरंग पसरले.शिक्षकांचा हा गौरव संपूर्ण गावाच्या अभिमानाचा क्षण ठरला.
