
.नाशिक (प्रतिनिधी) – मानवी जगण्यातील प्रेमभावना आणि वास्तव यांचा मेळ घालत कविता लेखन, गीत लेखन करणारे साहिर लुधियानवी यांच्या गीत व जीवन प्रवास यांचा तरल अभ्यासपूर्ण वेध मुग्धा पुष्कर लेले यांनी घेतला. हिंदी चित्रपट जगतातील आठवणींची सफर घडवून आणली व रसिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विश्वास ग्रुप व महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा जलालपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘साहिर के गीत, साहिर की बाते’ या दृक-श्राव्य कार्यक्रमाचे आयोजन विश्वास हब येथे करण्यात आले होते. मुग्धा लेले यांनी हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाचे आयोजक विश्वास ठाकूर व ऋचिता ठाकूर होते. तर संयोजन विनायक रानडे यांनी केले.

साहिर यांनी मानवी मनाच्या अनेक हळूवार क्षणांची, प्रेमाची जाणीव व्यक्त करणार्या अभिजात गीतांचे लेखन केले. एस.डी. बर्मन रोशन, रवी, ओ. पी. नय्यर अशा अनेक संगीतकारांसाठी त्यांनी गीते लिहिली आणि सिनेमाचे नवे युग निर्माण केले. रसिकांच्या ह्रदयाला भिडणारी साहिर यांची गाणी खर्या अर्थाने जीवन गाणी आहेत. याचा प्रत्यय विविध चित्रपटाच्या चित्रफितीतून उलगडून दाखवला. मनावर उमटलेल्या तरंगाचा शोध घेणारे ‘तोरा मन दर्पण कहलाये’ हे गीत त्यांच्या निर्मितीचा प्रवास रंजक होता. गुरूदत्त आणि अबार अल्वी यांनी निर्माण केलेला ‘प्यासा’ सिनेमा युग प्रवर्तक ठरला. साहिर यांच्या आशय प्रधान गीतांनी ह्या सिनेमाला प्रसिद्धी मिळाली. अशा अनेक सिनेमांच्या रंजक व सृजनशील आठवणी कार्यक्रमात लेले यांनी कथन केल्या. साहिर यांचे बालपण कुटुंब यांचा प्रवास तसेच यशस्वी गीतकाराचा जीवनशोध प्रेरणा देणारा होता.
यावेळी बोलतांना विश्वास ग्रुपचे कुटुंबप्रमुख विश्वास लिलावती जयदेव ठाकूर म्हणाले की, जुन्या गाण्यांची भुरळ अजुनही टिकून आहे. त्या

च आठवणींना त्या दिवसांमध्ये पुन्हा जाता यावे, यासाठी हा कार्यक्रम म्हणजे प्रत्येकाच्या हळव्या आठवणींचा गुच्छ आहे. यावेळी डॉ. पुष्कर लेले व मुग्धा लेले यांचा सन्मान विश्वास ठाकूर यांचे हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विनायक रानडे यांनी केले.
