
नाशिक जिल्ह्यातील, दिंडोरी तालुक्यातील खेडगाव हे गाव. समृध्दतेच्या आणि विकास पथावर वेगाने मार्गक्रमण करीत आहे. खेडगांव येथील एक यशस्वी आणि प्रगतीशील शेतकरी म्हणजे श्री.बाबुराव गंगाधर डोखळे. जे सध्या ७६ वर्षाचे आहेत.यांचे समाज जीवन सरळतेने सुरू झाले व दैदिप्यमान कमापर्यंत पोहोचले त्यांच्या जीवनाची आणि शेतीची ही योशोगाथा. सुरुवातीपासून आधुनिकतेची आणि शाश्वत शेतीची ओढ असल्याने विविध पद्धतीचे यंत्राने दाणे काढणे, कडबा कटरने जनावरांसाठी चारा मिळवणे, उसाचे पाचट वाया न जाऊ देता कंपोष्ट खते तयार करणे, सरी, कल्टीवेशन,रोटरी इ. च्या सहाय्याने शेतीची मशागत करून उत्पन्न वाढवणे शक्य लागले. यांत उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्रात सर्वप्रथम फळबागेसाठी ड्रीप इरिगेशनचा प्रयोग त्यांनी १९७८-७९ साली यशस्वीरित्या करून विक्रमी उत्पादन काढलेले होते.आपले उत्पन्न शाश्वत ठेवून,बाकी भागांतील शेतीची देखील आढावा घ्यावा आपल्या ज्ञानाचा उपयोग बाकी शेतकऱ्यांना देखील व्हावा यासाठी १९७९ मध्ये कादवा साखर कारखान्याने महाराष्ट्रातील ऊस शेती व इतर शेतीस पूरक उद्योगधंदे बाबत अभ्यास दौऱ्यात त्यांची नेमणूक केली. त्यांत पाडेगाव ऊस संशोधन केंद्र, सोमेश्वर सहकारी लिफ्ट योजना, वारणा सहकारी साखर कारखाना, अकलूज सहकारी साखर कारखाना अशा विविध नामवंत १६ सहकारी संस्थांना भेटी देऊन अभ्यास केला व त्या प्रत्यक्ष कृतीत उतरविला व मार्गदर्शन केले.१९८५ साली खेडगांव सहकारी सोसायटीचे चेअरमन झाले व शेती व पीक कर्ज, खते, औषधे, स्वस्त धान्य दुकान, ग्राहक भांडार इ. व्यवहार अतिशय कुशलतेने राबवून सभासदांची सेवा केली.विविध सरकारी योजनांचा फायदा गरीब शेकऱ्यांना मिळवून दिला. सन १९८८ साली ऑस्ट्रेलियातील अलबुरी या शहरात ४थी जागतिक मायक्रड्रीप इरिगेशन मेळावाभरला होता. त्यावेळी महाराष्ट्रात सर्वप्रथम हार्डी इरिगेशन ऑस्ट्रेलिया कंपनीचे ड्रीप सिस्टीम बसविली होती.त्या निमित्ताने जैन कंपनी जळगाव व हार्डी इरिगेश ऑस्ट्रेलिया यांच्या विद्यमाने बाबूराव डोखळे यांनी त्यावेळीचे माजी केंद्रीय कृषिमंत्री कै. अण्णासाहेब शिंदे, कृषि पद्मभूषण श्री.आप्पासाहेब पवार, सामाजिक कार्यकर्ते व समाज सुधारक श्री. अण्णा हजारे यांच्या समवेत ऑस्ट्रेलियात २१ दिवस जागतिक परिसंवादात भाग घेतला.या दौऱ्यातील अभ्यासातून भारतात आधुनिक पद्धतीने द्राक्ष लागवड सुरू केली.नाशिक जिल्ह्यातून सर्वप्रथम द्राक्ष निर्यात करणारे व स्वतःचे ” स्टारलिंग ब्लूम ग्रेप्स ” कंपनी रजि. करुन ३० टनाचे शीतगृह व ३.५ टनाचे प्री कुलींग पॅकींग हाऊससह उभे केले. परकीय चलन मिळविण्यासाठी हे एक मोलाचे योगदान समजले जाते. त्यांनी ऑस्ट्रेलिया सोबतच सिंगापूर देश बघितले व त्यांचे भाऊ सुभाष यांसही जागतिक ज्ञानात भर पडावी म्हणून १९८९ साली कॅलिफोर्निया (अमेरिका), १९९४ साली इस्रायल येथे ॲग्रीटेक मेळाव्यास पाठविले. भारतात सर्वप्रथम सी.पी.पी.यु. या संजीवकाचा सन १९९५ मध्ये वापर करून द्राक्ष शेतीस मार्ग दाखविला. कमी बेरीसाईज हा जागतिक बाजारपेठेतील मोठा अडथळा होता यावर कशाप्रकारे करता येईल हे याप्रयोगाद्वारे सिद्ध केले.तसेच प्रतिकुल परिस्थितीत द्राक्षाचे उत्पादन घेण्यासाठी रूट स्टॉकचा वापर करून अधिक उत्पादन कसे घ्यावे यासाठी देखील विविध प्रयोग देखील घेतले. या सगळ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यशस्वी प्रयोगाच्या प्रसारासाठी विविध शेतकरी मेळावे घेतले. त्यात अनेक मोठे राजकीय नेते, परराष्ट्रीय शास्त्रज्ञ, समाजसेवक इत्यादींनी भेटी देऊन अभ्यास देखील केला. या संपुर्ण कामाचा सन्मान म्हणुन श्री. बाबूराव डोखळे यांना 2002 सालचा वसंतराव नाईक कृषि भूषण पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, पुणे सन्मान, महाराष्ट्र -50 सन्मान, इत्यादी पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.ही आधुनिकतेची योशोगाथा नक्कीच आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरत आहे.
