
जळगाव निंबायती (वार्ताहर) – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने मे व जून महिन्यात घेण्यात आलेल्या बहुचर्चित शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी (टेट) परीक्षेत मालेगाव तालुक्यातील मेव्हणे येथील स्नेहल देवेंद्र देवरे हिने २०० पैकी १६६ गुण मिळवत नाशिक जिल्ह्यात अव्वल स्थान पटकावले आहे. राज्यात प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी अनिवार्य असलेली शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा २७ मे २०२५ ते ३० मे २०२५ आणि ०२ जून २०२५ ते ०५ जून २०२५ या कालावधीत राज्यातील २६ जिल्ह्यांमध्ये एकूण ६० परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली होती. सदर परीक्षेस एकूण २,२८,८०८ परीक्षार्थी उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी परीक्षेस एकूण २,११,३०८ प्रविष्ट झाले होते. सदर परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला असून राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी या बाबतची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. स्नेहल देवरे बी. एस. सी, बी. एड. विशेष प्रावीण्यसह उत्तीर्ण असून ती शिक्षक अभियोग्यता परीक्षेत खुल्या प्रवर्गातून प्रविष्ट झाली होती. तिने २०० पैकी १६६ गुण मिळवत मोठे यश संपादन केले आहे. स्नेहल जळगाव निंबायती येथील गो. य. पाटील विद्यालयातील जेष्ठ शिक्षक देवेंद्र देवरे यांची कन्या आहे. स्नेहलचे येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक मंडळ, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह पंचक्रोशीतील प्रतिष्ठित नागरिक, तरण युवक आदींनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी सुयश चिंतले आहे.
