
नाशिक:- माणसाच्या आयुष्यातील अनेक प्रश्नं त्याच्या आयुष्याबरोबरच संपून जातात. मात्र अंतर्मनातील भावनांची लेखनाच्या माध्यमातून मांडणी केल्यावर त्या प्रश्नांची व्यवस्थितपणे उकल होते, असे प्रतिपादन सुमती टापसे यांनी केले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात १८३वे पुष्प ‘अनुत्तरीत प्रश्न’ या पुस्तकावर गुंफताना त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक अलका दराडे होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, स्त्रियांच्या भावभावनांचा आणि अस्वस्थपणाचा पुस्तकात ताळमेळ साधला आहे. आयुष्यातील चढउतार आणि भेटलेल्या अनेक गोष्टी आणि प्रवृत्ती, संघर्ष, अस्वस्थता, मानसिक घालमेल इत्यादी बाबींचे दर्शन या पुस्तकात दाखवले आहे. मनाच्या खोल डोहात आपण खोल डोकावलो तरीही काही प्रश्नांची उत्तरेही सापडत नाहीत. कुसुम, विचारचक्र, मनातील डायरीची बंदिस्ते पाने, तिची घुसमट, माझं काही चुकलं का?, अशा कथांमधून भावना मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे, असेही त्या म्हणाल्या. हरिष राठोड आणि हेमंत टापसे यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर मधुकर गिरी यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१९) सागर जाधव-जोपूळकर ‘माती मागते पेनकिलर’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
