
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुस्तक परीक्षण-
भारतीय राजकारणात ज्यांचा विश्वगुरू असा सार्थ उल्लेख केला जातो, असे आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब यांचा जन्म१७ सप्टेंबर१९५० रोजी गुजरात राज्यातील वडनगर येथे झाला. त्यांची आई हिराबेन किंवा हिराबाई तर वडील दामोदरदासजी मोदी यांचे उत्तम संस्कार त्यांना प्राप्त झाले, कौटुंबिक संस्काराचा प्रभाव आणि भारतीय संस्कृतीचा आदर्श जपत नरेंद्र मोदी यांनी आपले जीवन राष्ट्राच्या सेवेसाठी समर्पित केले. अमृतमहोत्सवी वाटचालीतील त्यांचा ७५ वर्षाचा जीवनप्रवास म्हणजे एक प्रेरणापर्व आहे, आदर्श जीवन प्रणालीचा दीपस्तंभ आहे, भारतीय जीवनमूल्यांचा एक उत्कृर्ष मानबिंदू आहे. म्हणून हा चरित्रग्रंथ भारतीय युवा पिढीसमोर एक प्रकाशपर्व आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील मु.पो.ता.अकोले येथील ज्येष्ठ साहित्यिक पुंडलिक चिमणराव गवंडी- कुमावत यांनी ‘आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी’ हा लिहिलेला चरित्रग्रंथ अनेक वैशिष्ट्यांनी वाचकांसमोर साकार झाला आहे. लेखकाने हे चरित्र लिहिताना ‘हमारे नरेंद्रभाई’ हे हिंदीतील पुस्तक आहे, त्याचे श्रेय अनेक संतमहंत, हिंदी लेखकांचे आहे. या पुस्तकाचा चरित्रसंदर्भ पुंडलिक गवंडी यांनी घेतला असल्याचा उल्लेख त्यांनी मनोगतातून व्यक्त केला आहे. आपल्या मनोगतात पुंडलिक गवंडी लिहितात,” माननीय प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्रजी मोदी यांनी भारतातच नव्हे, तर जगात तथा सर्व लोकांच्यात एकमेव आदराचे स्थान मिळवले आहे. इतकं लोकप्रिय स्थान त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं प्राप्त केलं आहे.” असे सांगून लेखक पुढे लिहितात,” आज त्यांच्याइतका सक्षम नेता जगात दुसरा कोणताही नाही. चीन, रशिया, अमेरिकासुद्धा त्यांच्याकडे आदराने पाहतात. तथा त्यांचा गौरव करतात. त्यांच्या विचारांना प्राधान्य देतात. मग इतर छोट्या-मोठ्या देशांचा कोण विचार करतो ? फार वर्षांनी, म्हणजे जवळजवळ स्वातंत्र्याच्या नंतरच्या बऱ्याच कालावधीनंतर स्वतंत्र भारतात जन्मलेला असा सक्षम नेता भारताला मिळाला आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घेऊन, त्यांच्या विचारांचा पाठपुरावा करायला हवा.” चरित्रकार पुंडलिक गवंडी यांनी आपल्या चरित्रलेखनाची भूमिका स्पष्ट करून अतिशय संयतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे चरित्र थोडक्या पृष्ठांत पण प्रभाविपणे सांगितले आहे. ‘आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी’ या पुस्तकाची चरित्रकार पुंडलिक गवंडी यांनी १६ प्रकरणात विभागणी केली आहे, त्यामध्ये ‘भारताचे पंतप्रधान ‘ या लेखात चरित्रचिंतन व्यक्त करून काव्यात्म स्वरूपात संदर्भ घेत कर्तृत्वाचा आढावा घेतला आहे. ‘मा. नरेंद्रजी मोदींच्या मनातले विचार’ या दुसऱ्या प्रकरणातून आध्यात्मिक शक्ती, मूर्तिपूजा असे मुद्दे घेऊन नरेंद्र मोदी यांच्या विचारांचे विशेष सांगितले आहेत. ‘वज्रादपि कठोराणि ‘ या प्रकाणातून नरेंद्र मोदी यांच्या गुजरात राज्यातील विविध उपक्रम आणि त्यातील त्यांचे कर्तृत्व अधोरेखित करून लेखक लिहितात, ” वज्रादिप कठोराणि मृदूनि कुसुमादपि ।लोकोत्तराणां चेतासि कोनु विज्ञातु मर्हति ॥ धृ ॥अशा गुणांनी युक्त आपले पतप्रधान नरेंद्र मोदी यांचे व्यक्तिमत्त्व आहे. अशी विविध गुणसंपदा त्यांच्या ठायी एकवटलेली दिसून येते. समाजात पसरल्या जाणाऱ्या अफवांवर आंधळेपणाने कधीही विश्वास ठेवत नाहीत.” असे लिहिले आहे.मोदींनी दोन वर्षे हिमालयामध्ये संन्याशांच्या सोबत तत्संग केला आहे. आश्रमात सेवासाधना केली आहे. ते हिमालयाच्या डोंगर दऱ्यात फिरले, भगवेवस्त्र परिधान केले. घरी आल्यावर ते संसारात रमले नाहीत तर घर सोडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक झाले. मातृभूमीच्या सेवेसाठी आपले जीवन समर्पित केले.१९८६ साली संघाने त्यांना राजकारणात आणले. ते गुजरातचे प्रभावी मुख्यमंत्री म्हणून सिद्ध झाले.२०१४ पासून ते भारताचे उत्तम पंतप्रधान म्हणून लोकप्रिय ठरले. असे संदर्भ सांगितले आहेत. ‘आणीबाणी’ या प्रकरणातून त्यांची भूमिगत अवस्था आणि कार्याचे वर्णन केले आहे. ते एम्.ए. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.१९७९-८० या काळात त्यांना शिक्षणासाठी परदेशात जायचे होते पण त्यांना व्हिसा मिळाला नाही. ते भावनगरच्या तुरुंगात होते. नरेंद्र मोदी हे काळानुसार कृतीशील, विचारशील राहिले. तंत्रज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय त्यांनी साधला. ‘गुजरातचे मुख्यमंत्री’ या प्रकरणात त्यांच्या कार्याचा आढावा घेतला आहे.०६ ऑक्टोबर२००१ रोजी ते गुजरातचे मुख्यमंत्री घोषित झाले. त्यांच्या विविध कार्याचा येथे विस्तृत परिचय करून दिला आहे. ‘सर्वात शक्तिशाली मजबुत नेता’ या प्रकरणात नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाची मांडणी केली आहे. ‘मातृभूमी स्वर्गादपि गरियसि’ या प्रकरणातून नरेंद्र मोदी यांच्या देशभक्तीचे संदर्भ सांगितते आहेत. हाच संदर्भ स्पष्ट करीत ‘नरेंद्र मोदी एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व’ भरभरून चित्रित झाले आहे. गोधरा घटना, मोरबी येथील महापुरातील त्यांचे सेवाकार्य, गोरगरीब यांच्यासाठी कार्य,०७ ऑक्टोबर२००१ रोजी गुजरात राज्याचे १४ वे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी आणि गुजरातचे भूकंप संकट यांचे वर्णन आले आहे.२००१ साली त्यांनी घेतलेल ‘बेटी बचाव’ मोहीम हाती घेतली, दरहजारी मुलांमध्ये मुलींचा जन्मदर ८३१ पाहून ते व्यथित झाले. दशकांनंतर हे प्रमाण ९०३ करण्यात त्यांनी केलेले प्रबोधनकार्य, उपक्रम प्रेरणादायी आहेत.३१ ऑगस्ट२०१२ रोजी त्यांनी गुगल प्लसमध्ये भाग घेतला, त्यांना २० हजाराहून अधिक प्रश्न विचारण्यात आले. अनेक देशातून हे प्रश्न आले होते. त्यात त्यांनी समर्थपणे उत्तरे दिली.२०१४,२०१९ आणि२०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत त्यांनी दाखविलेले कर्तृत्व, नेतृत्व यांचा ऊहापोह या प्रकरणात केला आहे. ‘नरेंद्र मोदी’,’ विकासाच्या वाटेवर’,’ न.मो. चं मौन’,’ कुशल वक्ते’,’ श्री नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी योग क्षमता असलेले नेते’,’ विराट व्यक्तिमत्त्व’,’ नाविण्यपूर्ण व्यक्तिमत्त्व’ आणि ‘मन की बात यातून आत्मनिर्भरतेचा संदेश’ अशा प्रकरणातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचा सोप्या भाषेत करून दिलेला चरित्रात्मक परिचय मनात रुजतो आणि वाचक मोदीमय होऊन जातो. हेच या चरित्राचे यश म्हणावे लागेल. माजी मुख्याध्यापक , शिक्षण क्षेत्रातील तपस्वी व्यक्तिमत्त्व असलेले पुंडलिक गवंडी- कुमावत यांनी४० हून अधिक पुस्तके लिहिली आहेत. आकाशवाणीवरून त्यांचे चिंतन अनेक वर्षापासून सुरू आहे. ‘हातोडा’ हे त्यांचे आत्मचरित्र १९९२ मध्ये प्रकाशित झाले आणि त्यानंतर त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले, त्यांना शेकडो पुरस्कार लाभले आहेत, त्यांच्या हातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रभावी चरित्रलेखन झाले, हे अभिनंदनीय आहे. या पुस्तकाला सोमनाथ गायकवाड यांचे छान मुखपृष्ठ लाभले आहे. तनिष्का टाईपसेटर्स, नाशिक यांचे अक्षरवैभव वाचनीय आहे. या सर्व अंतर्बाह्य, वाङ्मयीन वैशिष्ट्यांनीयुक्त हा चरित्रग्रंथ देशभक्ती आणि नेतृत्वशक्तींचा प्रभावी दस्तऐवज आहे.———————–पुस्तक परीक्षण:- डॉ.बाबुराव उपाध्ये, इंदिरानगर, श्रीरामपूर जि. अहिल्यानगरभ्रमणसंवाद:-९२७००८७६४०———————- ‘आपले पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी’तनिष्का पब्लिकेशन, नाशिक, संजीवनी सुनील साखरे, विवेकानंदनगर, नाशिकएक्सेल प्रिंटिंग प्रेस, पुणे,०४ जानेवारी२०२४पृष्ठे८५, मूल्य१५० रुपये———————–
