
नांदगाव ( प्रतिनिधी ) छत्रपती संभाजीनगर येथुन साखरपुड्यासाठी मालेगावकडे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खाजगी प्रवासी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस उलटुन ३५ वऱ्हाडी जखमी झाले. जखमींपैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. नांदगाव -मालेगाव रस्त्यावरील नाग्या -साक्या धरणाजवळील वळणावर रविवारी हा अपघात झाला. जखमी मध्ये सर्वाधिक महिलांची संख्या जास्त आहे.

छत्रपती संभाजीनगर येथुन मालेगाव येथे साखरपुड्यासाठी वऱ्हाडींना घेऊन निघालेली लक्झरी बस (एम.एच.०४ जी.पी. ५७७२ ) नांदगाव -मालेगाव रस्त्यावरील हिंगणवाडी शिवारातील वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्यावरुन खाली उलटली . या अपघाताची माहिती मिळताच पोलिस व रहेनुमा फाऊंडेशनचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अपघातात जखमी झालेल्या ३५ जणांना ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. जखमी झालेल्या सर्वांची नावे समजु शकली नाही.

ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.काजल साळुंखे यांनी वैद्यकीय पथकासह जखमींवर प्राथमिक उपचार सुरू केले आहे. जखमी पैकी नजीमा शेख जावेद (५०),हबीबा शेख (६५) परीस शेख अन्वर (५) रजीया सय्यद (४५) निषाद अन्सारी ( १९) हे गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव व छत्रपती संभाजीनगर येथे रवाना करण्यात आले आहे.
