
ओझर: दि.१९( वार्ताहर )विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणाचा विकास व त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी येथील माधवराव बोरस्ते विद्यालयात विद्यार्थ्यांनी कार्यानुभव अंतर्गत टाकाऊ वस्तुपासून टिकाऊ आणि सर्वधर्मसमभाव संस्कृती संवर्धन अंतर्गत विद्यार्थ्यांनी आकर्षक गुढ्या तयार केल्या. या उपक्रमात पाचवी ते सातवीचे सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांना कलाशिक्षिका मोनाली निकम, वर्षा पाटील यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर अभिनवच्या मुख्याध्यापिका वनिता शिरसाठ क्रीडा शिक्षक प्रभाकर लवांड उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक करीत शक्य असल्यास विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात गुढ्या बनवून त्यांची विक्री करावी त्यातून विद्यार्थ्यांना व्यवहारी ज्ञान मिळेल असे आवाहन केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन मोनाली निकम यांनी केले.


