
जळगाव निंबायती (वार्ताहर) मालेगाव तालुक्यातील देवीमळा कौळाणे (निं) येथील जि. प. प्राथमिक शाळेच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळा संकल्पनेतंर्गत क्षेत्रभेटीचे व वनभोजन उपक्रम राबविला. एक शिक्षकीय वस्तीशाळेच्या स्वरूपात एकोणीस वर्षांपूर्वी लावलेल्या शिक्षणरुपी इवल्याशा रोपट्याचे आज एका मोठ्या शैक्षणिक वृक्षात रूपांतर झाले आहे. परिसरातील शेकडो कुटुंबांना घरापासून जवळ शिक्षणाची सोय उपलब्ध झाल्याने परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे. देवीमळा शाळा परिसरात यावेळी विद्यार्थ्यांनी भारतीय प्रजातीच्या विविध वृक्षाचे रोपन करत स्वच्छता मोहीम राबविली. चार भिंतीत वर्गात दैनंदिन पाठ न घेता पाठाचा विषय लक्षात घेऊन प्रत्येक शिक्षकांनी निसर्गाच्या सान्निध्यात विद्यार्थ्यांना अध्यापन केले.

प्रसंगी विद्यार्थ्यांनी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला वाव मिळावा म्हणून हिरवळीवर विद्यार्थ्यांचे विविध नाविन्यपूर्ण खेळ, राष्ट्रभक्तीपर गीत, अभिनय गीत, घोषणा, गोष्टी, नाटीका चुटकुले आदी भरगच्च उपक्रम कार्यक्रम राबविले. तसेच परिसरातील अशोक खैरनार यांनी विद्यार्थ्यांच्या स्नेहभोजन भोजनाची व्यवस्था केली. प्रसंगी कालिका ऑइल मिलला भेट घेऊन टायर पासून कच्चे तेल व डांबराची निर्मिती ट याबाबत संदीप दुकळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी मेंढपाळांचा वाड्यास भेट देत त्यांची होणारी सततची भटकंती व मेंढपाळांचे जीवन समजावून घेतले. यावेळी सरपंच मिनाक्षी भाऊसाहेब खैरनार, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन कदम, सदस्य प्रतिभा खैरनार, मुख्याध्यापक प्रशांत कुलकर्णी, संदीप दुकळे युवा प्रशिक्षणार्थी स्वाती कदम आदी उपस्थित होते.
