
विंचूर दि.२९(प्रतिनिधी, संदिप शिरसाट) मनुष्य जन्म हा परमेश्वराचा सर्वात मोठा आविष्कार आहे. मनुष्य जन्मात पराक्रम करावा,वसुंधरेचा आनंद घ्यावा. नामस्मरण करावे. संत चरित्र समजून घ्यावे व आचरणात आणावे. ज्ञानेश्वरी जगण्यामध्ये आणावी. आई वडीलांनी आध्यात्मिक होण्याचा प्रयत्न करावा.कारण आध्यात्माने कुळ पुण्यवान होते.व कुळाच्या पुण्याईनेच कुळात देव, संत, ऋषी जन्मास येतात असे प्रतिपादन नागपूर येथील विद्यावाचस्पती ह.भ.प. विवेक घळसासी यांनी केले.घळसासी हे येथील निसर्ग मंगल कार्यालयात कै. विमल वासुदेव दुसाने यांच्या प्रथम स्मृति दिनानिमित्त आयोजित सात दिवसीय रामकथेचे तिसरे पुष्प गुंफताना बोलत होते.पुढे बोलताना घळसासी यांनी रामकथा फक्त ऐकून चालणार नाही. तर रामकथा आचरणात आणावी लागेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडता पाडता परमार्थ करावा. संसारातील अडचणी राम नामाने दुर होतात.व राम नामाच्या स्मरणाने तुमच्या मध्ये राम चरीत्र अवतरु लागते. भक्ती करता करता तुमच्या आतमध्ये राम प्रगट होऊ लागतात व अवघे जीवन राममय होऊन जाते.असे सांगितले यावेळी वारकरी सांप्रदाय व विंचूरकर ग्रामस्थ उपस्थित होते.
