
नाशिक:-( प्रतिनिधी )साहित्याची निर्मिती निसर्ग, प्रेम, दु:ख, वेदना यांतून होते. साहित्यात समाजमनाचं प्रतिबिंब दिसून येत असतं. म्हणूनच आपल्या साहित्यात विचार मांडताना साहित्यिकाची भूमिका स्पष्ट असावी, असे विचार अरुण घोडेराव यांनी मांडले. गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या अभिनव उपक्रमाचे १७६वे पुष्प गुंफताना ‘काफीरनामा’ या पुस्तकावर ते बोलत होते. गझलकार प्रा.निशांत गुरू अध्यक्षस्थानी होते. अरुण घोडेराव पुढे म्हणाले की, साहित्य एकांगी नसावे. आयुष्यात जसे परिवर्तन घडत जाते, तसे साहित्यात घडायला हवे. कित्येक दिवस नुसतेच दुःख कवटाळून बसायचे, याचाही विचार साहित्यिकांनी केला पाहिजे. आयुष्यात घडलेल्या अनेक प्रसंगात अनेक माणसं भेटली आणि त्यातून सामाजिक भान आले. काफीरनामा संग्रहात सामाजिक जाणिवांचे आत्मभान जागवणाऱ्या आणि समाजाला दिशा देणाऱ्या कविता आहेत, असेही ते म्हणाले. विजयराव खंडेराव, डॉ.ठकसेन गोराणे या भाग्यवान श्रोत्यांना ग्रंथभेट देऊन सन्मानीत करण्यात आले. मधुकर गिरी यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले तर अलका दराडे यांनी आभार मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२९) प्राचार्य डॉ.किशोर पवार ‘अंधश्रद्धेचे ग्रहण’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.
