
नाशिक:-(प्रतिनिधी). चौरंग या संस्थेच्या माध्यमातून लोककला आणि नाट्यकलेला प्रोत्साहन देणारे ज्येष्ठ रंगकर्मी अशोक हांडे यांना गिरणा गौरव प्रतिष्ठानचा यंदाचा मानाचा ‘जीवन गौरव’ पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा ५ एप्रिल रोजी नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिरात सायंकाळी ५ वाजता होणार आहे. रक्कम रुपये एकवीस हजार, स्मृतिचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्काराची घोषणा निवड समितीने काल केली. उत्तर महाराष्ट्राचा मानाचा स्तंभ म्हणून सातासमुद्रापार ओळख निर्माण करणारी खान्देशची जीवनवाहिनी असलेल्या गिरणा या नदीच्या नावाने गेल्या २५ वर्षांपासून महाराष्ट्रामधील विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने दर पाच वर्षांनी सन्मानीत करण्यात येते. २५ वर्षातला हा पाचवा जीवन गौरव पुरस्कार अशोक हांडे यांना प्रदान करण्याचा निर्णय समितीने घेतला. मराठी गायक, पटकथाकार, लेखक, दिग्दर्शक, नाटककार, लोककला आणि नाट्यकलेला त्यांनी प्रोत्साहन देण्याचे महत्त्वपूर्ण काम हांडे यांनी केले आहे. मराठीबाणा, आवाज की दुनीया, आझादी ५०, माणिकमोती, मंगलगाणी दंगलगाणी, गाणे सुहाने, मधुबाला आदी कार्यक्रम त्यांचे लोकप्रिय ठरले आहेत. म्हणूनच अशोक हांडे यांना जीवनगौरव प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती माजी आ.नानासाहेब बोरस्ते, ॲड.मिलिंद चिंधडे, प्रा.डॉ.लक्ष्मण महाडिक, डॉ.एस.के.पाटील, तुकाराम ढिकले, अशोक पाटील यांनी दिली.
