लेखक-शंकर नामदेव गच्चे जि.प. प्रा.शा.वायवाडी ता.हिमायतनगर जि. नांदेड मोबाईल नंबर-८२७५३९०४१०


महायोध्दा मल्हारराव होळकर मराठी सरदारांना मराठी राज्याचा पंतप्रधान होता येत नसेल तर,आम्ही स्वतःचे स्वराज्य निर्माण करू,असे म्हणणारे.महाराज मल्हारराव होळकर यांचा जन्म -१६ मार्च१६९३ ला होळ या गावी झाला. त्यांचे वडील खंडूजी वीरकर हे मूळचे पुण्याजवळील वाफगावचे होते.पुढे ते फलटण जवळील नीरा नदीच्या काठी होळ इथे येऊन राहिले. त्यावरून त्यांना होळकर या नावाने सर्व ओळखू लागले . मल्हाररावांचे वडील खंडोजींच्या मृत्यूनंतर मल्हाररावांचे बालपण खानदेशातील तळोदा येथील भोजराज बारगळ मामाकडे गेले. भोजराज बारगळ हे कदम बांडे यांच्या सैन्यात २५ स्वाराचा नायक होते. पुढे१७०१ ते १७०८ पर्यंत मामाच्या सैन्यात मल्हाररावांना सैनिकी शिक्षण मिळाले.डिसेंबर १७१८ पासून कदमबांडे यांच्या सैन्यात मल्हाराव शिलेदार म्हणून काम करू लागले. जून १७२४ ला मल्हाररावांची कामगिरी पाहून पेशव्यांकडून त्यांना इंदोर ठाणे बक्षीस मिळाले.सन १७२५ ला पेशव्यांकडून ५०० स्वारांची मनसब मिळाली. ६ ऑगस्ट १७२७ ला ते अकरा जिल्ह्याचे सरंजामदार बनले.मार्च १७२८ला सरंजामदार या पदांमध्ये वृद्धी झाली. आणि २६ मे १७२८ इंदौर येथे त्यांनी स्वतंत्र राज्यकारभारास सुरुवात केली. आॕक्टोबर१७२८ माळवा प्रांतातील सरदेशमुखी आणि चौथाई वसुलीचे पूर्णाधिकार मल्हाररावांना प्राप्त झाले.३आॕक्टोबर १७३० ला माळव्यातील सर्वच अधिकारी म्हणून मल्हाररावांची नेमणूक झाली. दुसरे पंतप्रधान पेशवे बाळाजी विश्वनाथ नंतर मराठी राज्याचा पंतप्रधान होण्याची इच्छा सरदार मल्हारराव होळकरांची होती. परंतु मराठी राज्यात कोकणस्थ ब्राह्मणांचे वर्चस्व वाढल्यामुळे आणि पहिले छत्रपती शाहू निष्क्रिय निघाल्यामुळे मराठी सरदारांच्या कार्याची कदर करणारा कोणी शिल्लक नव्हता.

त्यामुळे मराठी सरदारांना मराठी राजाचा पंतप्रधान होता येत नसेल तर आम्ही स्वतःचे साम्राज्य निर्माण करू” अशी इच्छा मल्हारराव होळकरांची झाली. पुढे त्या दृष्टीने पावले उचलीत अहिल्याबाई होळकर घरात आल्यानंतर गौतमाबाईचे नावे पेशव्यांकडून खासगीत जहागीर मिळवून घेतली. २० जानेवारी१७३४ रोजी बाजीरावांनी गौतमाबाईच्या नावे उत्पञात २,९९,०,१० ची “खासगी” जहागीर दिली.ही जहागीर प्राप्त झाल्यानंतर इंदौर राजाची खऱ्या अर्थाने स्थापना झाली. त्यावेळेस अहिल्याबाईचे वय नऊ वर्षाचे होते. तरीपण तिने समजदारी आणि बुद्धिमत्तेच्या बळावर सासू-सासऱ्यांची मने जिंकून घेतली होती.सासु गौतमाबाई तेजस्वी,धैर्यवान,साहशी, स्पष्ट वागणारी, हुशार होती. युद्धावर गेल्यानंतर राज्याचा कारभार गौतमाबाई पाहत असत. अहिल्याबाई घरात आल्यानंतर गौतमाबाईला राज्यकारभार सांभाळण्यास मदत झाली आणि पुढे अहील्याबाई स्वतः राज्यकारभार पाहू लागली. अहिल्याबाईच्या सहकार्यामुळेच होळकरांचा राज्य विस्तार होण्यास हातभार लागला. अहील्याबाईला १ डिसेंबर १७४५ ला पुत्ररत्न आणि १४ आॕगस्ट १७४८ कन्यारत्न झाले. मुलाचे नाव मालेराव आणि मुलीचे नाव मुक्ताबाई ठेवले.मल्हाराव होळकर युध्दाहून परत आल्यानंतर अहील्याबाईना राज्यकारभार सांभाळण्याचे शिक्षण देत. देशाची स्थिती,राजनीती,व्यावहारिक शिक्षण,डावपेच ,युध्दनीती, युद्धक्षेत्रावर बजावयाची कामगिरी, युद्धातील समस्या, राज्यकारभारातील समस्या,शासन प्रशासनातील अनेक गोष्टी महाराज मल्हारराव होळकररांकडून अहिल्याबाई शिकत

होत्या. महाराज मल्हारराव होळकर यांनी पत्नी गौतमाबाई आणि सून अहील्याबाई यांना तीर्थयात्रा करण्यासाठी पाठवीत, अहिल्याबाई घोड्यावर बसून तीर्थयात्रेच्या निमित्ताने राज्यात फिरूनी येत त्यामुळे राज्याची भौगोलिक सामाजिक व राजनीतिक स्थिति त्यांना जाणून घेता आली. महाराज मल्हाररावांबरोबर वीर खंडेराव युद्धावर जात असत. त्यावेळी राज्याचा महसूल वसूल करणे, न्याय देणं,धन,सैना,गोळा बारूद,रसद,तोफा, घोडा, बैल चाराचंदी इत्यादी सर्व कामे स्वतः अहील्याबाई पाहत.अहील्याबाईला इंदौर राज्याचीच नव्हे तर संपूर्ण भारताची माहिती होती.
एका साधारण मेंढपाळाच्या मुलाने आपल्या इच्छाशक्ती व पराक्रमाच्या बळावर आपले स्वतःचे लोककल्याणकारी राज्य उभे केले.ज्यांनी माळव्याची सुभेदारी व इंदुरचे राज्य उभे करताना आपल्या हयातीत ५२ लढाया जिंकल्या , ज्यांच्या फ़क्त नावाने ही शत्रूंची छावणी व गावे ओस पडायची अशा महान जागतिक महायोद्धा म्हणजेच सुभेदार मल्हारराव होळकर होय…आज सर्व जगात होळकरशाहीच्या गौरवशाली इतिहासाचे आकर्षण आहे पण या सर्व झुंजार रणयोद्धांचे प्रेरणास्थान होते मल्हारराव होळकर. मल्हारराव होळकर म्हणजेच होळकर साम्राज्यचे मुळ पुरुष होत. एक साधारण धनगर कुटुंबातील मुलगा स्वतःचे राज्य उभे करतो ही घटनाच भारताच्या इतिहासातील अनन्यसाधारण घटना आहे. मल्हारराव प्रचंड स्वाभिमानी , मुसुद्धी व पराक्रमी होते.मल्हारराव होळकर हे पुरोगामी विचारांचे होते.आपला मुलगा खंडेराव स्वराज्यासाठी शहीद झाल्यावर आपल्या सुनेला अहील्याबाई यांना धर्माचे कायदे बाजूला ठेवून सती जाण्यापासून रोखून राज्यकारभाराची संपूर्ण जबाबदारी सोपवतात. एवढेच नव्हे तर आपली पत्नी गौतमाबाई यांचेकडे खासगी राज्यव्यवहार कोष सोपविला. मल्हारबा यांनी अहील्याई यांना राजकारण , अर्थकारण, प्रशासन या विषयात प्रशिक्षण देऊन उत्तर भारतात मराठा साम्राज्य संवर्धीत केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यचा विस्तार करण्यासाठी मल्हारबानी अफगाण अटक पर्यंत आपल्या शौर्याने स्वराज्याचे भगवे झेंडे रोवले आहेत.
महायोद्धा अजिंक्यविर रणमार्तंड मावळाधिपती इंदौरनरेश थोरले श्रीमंत सुभेदार राजे मल्हारराव होळकर यांना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन! व मानाचा मुजरा!
